यवतमाळ : महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाची असो यवतमाळ जिल्ह्याला त्यात लालदिवा मिळणारच हे आतापर्यंतचे राजकीय समीकरण राहिले आहेत. परंतु यावेळी पहिल्यांदाच भाजपा सरकारमध्ये लालदिव्यांची ही परंपरा खंडित झाली आहे. राज्याच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याचे वेगळे महत्व आणि वजन आहे. हे महत्व प्रत्येकच सरकारमध्ये अधोरेखित झालेले पाहिले गेले आहे. यवतमाळ जिल्ह्याने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने तब्बल साडेतेरा वर्ष महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व दिले. तेव्हापासून राज्यात सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्याला लालदिवा अर्थात मंत्री पद मिळाले नाही, असे कधी घडले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तर किमान दोन मंत्रीपदे आणि तिही कॅबिनेट दर्जाची ठरलेलीच असायची. मावळत्या सरकारमध्येसुद्धा शिवाजीराव मोघे, मनोहरराव नाईक हे कॅबिनेट मंत्री होते. वसंतराव पुरके यांच्या रुपाने विधानसभा उपाध्यक्ष म्हणून आणखी एक लालदिवा जिल्ह्याला मिळाला होता. एवढेच नव्हे तर १९९५ मध्ये भाजपा-शिवसेना युती शासनाच्या काळातसुद्धा यवतमाळ जिल्ह्याला राजाभाऊ ठाकरे यांच्या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून लालदिवा मिळाला होता. परंतु यावेळी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा लालदिवा विझल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्यात कुण्या पक्षाचे नवे सरकार स्थापन होत आहे आणि त्यात यवतमाळ जिल्ह्याला प्रतिनिधीत्व नाही, हा प्रकार पहिल्यांदाच घडतो आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूरही ऐकायला मिळतो आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जिल्ह्याला तीन लालदिवे होते. नव्या सरकारमध्ये एकही दिवा मिळाला नाही. भाजपा सरकारने अप्रत्यक्ष जिल्ह्याचे नुकसान केल्याच्या आणि पहिल्याच टप्प्यात लालदिवा मिळविण्याची जिल्ह्याची राजकीय परंपरा खंडित केल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्याची लालदिव्यांची परंपरा खंडित
By admin | Published: November 01, 2014 1:10 AM