मारेगाव (यवतमाळ) : पावासाळ्यात अतिवृष्टी, त्यानंतर पावसात मोठा खंड आणि नंतर सोयाबीन पिकावरील यलो मोझॅकमुळे पीक हातचे गेले, तर कापूस उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट आली आहे. त्यामुळे पीक विम्याचे अग्रीम मिळेल, ही आशा शेतकऱ्यांना होती. दुसरीकडे शासनाकडून दुष्काळी मदत मिळेल, ही आशा होती. मात्र, दिवाळी तोंडावर आली असतानाही शासनाची कोणतीही मदत शेतकऱ्यांना अजून मिळाली नाही. त्यामुळे ना दुष्काळ ना अग्रीमचा पत्ता. त्यामुळे तुम्हीच सांगा साहेब, आम्ही दिवाळी साजरी करायची तरी कशी, असा प्रश्न पुढे येत आहे.
यावर्षी तालुक्यात ३४ हजार हेक्टरवर सोयाबीन व कापूस पिकाची लागवड झाली. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली आणि वर्धा नदी काठावरील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसानीचे पंचनामे केले. पण, अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. नुकतेच राज्य शासनाने राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. काही ठिकाणी विम्याची अग्रीम देण्याच्याही सूचना केल्या. मात्र, यात विदर्भातील नुकसानग्रस्तांना कोणतीही मदत मिळाली नाही. उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट येऊन अद्याप ना अग्रीमची रक्कम मिळाली, ना तालुक्याचा दुष्काळात समावेश केला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार का, असा प्रश्न आहे. दिवाळीच्या तोंडावर शासनाने सोयाबीन नुकसान पाहणीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले. कृषी विभागाने तात्पुरता दाखवत नुकसानीचे पंचनामे केले. परंतु, नुकसान भरपाई मिळणार काय? आणि किती मिळणार आणि कधी मिळणार, याबाबत कोणीही माहिती द्यायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मदतीकडे आस लावून बसला आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
आज तालुक्यातील शेतकरी आस्मानी संकटात आहे. नापिकीची मोठी झळ सोसावी लागत आहे. यातच शेतमालाचे भाव कोसळले आहेत. राज्यात सोयाबीन, कापूस पिकांना मिळणाऱ्या भावापेक्षा तालुक्यात कापूस, सोयाबीनची खरेदी कमी दरात सुरु आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पिळवणूक सुरू आहे. त्यातच वजन काट्यात पाप असल्याची ओरड शेतकरी करीत आहे. याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची मागणी होत असताना मात्र लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
वीज अधिकाऱ्यांना दिलेल्या अल्टिमेटमचे काय झाले
तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिंचन ठप्प झाले आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके सुकून जात आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी वीज वितरणच्या कार्यालयात जाऊन वीज वितरणच्या अभियंत्यांना धारेवर धरत ३१ ऑक्टोबरपर्यंत दिवसा वीज पुरवठा द्या. अन्यथा आंदोलन करू, असा अल्टिमेटम दिला होता. अल्टीमेटमची मुदत संपून आठवडा झाला. त्यामुळे शेतकरी अल्टीमेटमचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.