बच्चु कडू : दोषींवर कठोर कारवाईच्या सूचना, नागरिकांशी संवादउमरखेड : कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना निरपराधांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, असे प्रहार संघटनेचे अध्यक्ष अचलपूरचे आमदार बच्चु कडू यांनी येथे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीनंतर उमरखेड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहराची पाहणी करण्यासाठी आमदार कडू गुरूवारी उमरखेड शहरात दाखल झाले होते. त्यांनी उमरखेड शहरात फेरफटका मारून परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर रात्री उमरखेडच्या विश्रामगृहावर अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची भेट घेतली. शहरातील सदर घटनेची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच या प्रकारणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. दिलीप धोटे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुदळे, प्रा. सुरेल झोड, शिवकरण वंचेवाड, वैभव माने, जगदीश राणे उपस्थित होते. दगडफेकीत पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. पोलिसांवर हात उचलणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध पोलिसांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
उमरखेड दगडफेक घटनेत निरपराधांना त्रास देऊ नका
By admin | Published: September 18, 2016 1:24 AM