५३० शाळांना तंबी : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पत्राने संस्थाचालकांची भंबेरी अविनाश साबापुरे । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हाभरातील खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेच पाहिजे, अशी सूचना पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. त्यावरून माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही बसवेपर्यंत ५३० शाळांची मान्यता नुतनीकरण न करण्याची तंबी दिली आहे. या शिवाय कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक बसविणेही बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये भौतिक सुविधांची वाणवा आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटनाही वाढत आहेत. त्याची दखल घेत महिला व बाल कल्याण समितीने पोलीस अधीक्षकांकडे हा मुद्दा मांडला. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत एकंदर ५३० शाळा येतात. यात प्रामुख्याने खासगी माध्यमिक शाळांचा समावेश आहे. त्यापैकी ३७५ शाळा अनुदानित तर १५५ शाळा विनाअनुदानित आहेत. या प्रत्येक शाळेत नव्या शैक्षणिक सत्रापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेच पाहिजे, असा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, खासगी शाळांना दरवर्षी शिक्षणाधिकाऱ्यांकडून संस्थेची मान्यता नुतनीकरण करून घ्यावी लागते. त्यासाठी प्रस्तावांचा ढिग शिक्षणाधिकारी कार्यालयात येऊन पडला आहे. परंतु, जोवर शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि बायोमेट्रिक मशिन बसविण्यात येत नाही, तोवर त्या संस्थेची मान्यता नुतनीकरण करून देण्यात येणार नाही, अशी कठोर भूमिका शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली. सीसीटीव्ही आणि बायोमेट्रिकबाबत एसपी साहेबांचे पत्र आले आहे. बायोमेट्रिकचा तर शासनाचा जीआरच आहे. त्यामुळे शाळांना या गोष्टी कराव्याच लागतील. - चिंतामण वंजारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी महिला व बालकल्याण समितीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविण्याची सूचना केली आहे. शाळांना आदेश देणे हे माझे काम नसले तरी सुरक्षेसाठी ही बाब गरजेची आहे. - एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक
सीसीटीव्ही बसवा, नाही तर मान्यता गमवा
By admin | Published: May 08, 2017 12:11 AM