लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पालकमंत्री, तहसीलदार यांनी मोठ्या दिमाखात कार्यक्रम घेऊन गरीब लाभार्थ्यांना शासकीय मदतीचे धनादेश वाटले. पण ते शासकीय धनादेश चक्क तीन वेळा बाउन्स झाले. मदत वाटपाचा राजकीय ‘इव्हेंट’ पार पडला, पण लाभार्थ्यांच्या झोळीत काहीच पडले नाही. अखेर आम्हाला धनादेश नको, रोख मदतच द्या, असा टाहो लाभार्थी विधवेने फोडला.गरिबाच्या मृत्यूचे राजकीय पुढारी आणि प्रशासन कसे भांडवल करते याचा जिवंत नमुना यवतमाळात घडला. येथील गौतम नगरात राहणाºया दीपक इंगळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे कुटुंब निराधार झाले. आजारी आई, पत्नी, कडेवर खेळणारी दोन मुले एवढा परिवार पोरका झाला. त्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली. स्थानिक प्रशासनाने १४ डिसेंबर रोजी मोठ्या थाटामाटात कार्यक्रम घेऊन मदतीचा धनादेश दिला. पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते हे वाटप झाले होते. तर तहसीलदारांच्या स्वाक्षरीचा २० हजार रुपयांचा धनादेश लाभार्थ्यांना देण्यात आला.दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेली सपना इंगळे बँकेत चकरा मारून थकली, पण हा शासकीय मदतीचा धनादेश तब्बल तीन वेळा बाउन्स झाला. याच दरम्यान दीपकची आई गंभीर आजारी पडून दगावली. दीड वर्षाचा मुलगाही आजारी आहे. उदरनिर्वाहाची काहीच सोय नसल्याने अखेर सपना लोकांच्या घरी, लग्न समारंभात धुणी भांडी करून कुटुंबाचा गाडा चालवित आहे.शुक्रवारी ‘लोकमत’ने शासकीय मदतीचे हे भयंकर वास्तव प्रकाशित केले. सपना आणि तिचे वडील भास्कर हिवराळे यांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही. दोन वेळचे जेवण मिळणेच दुरापास्त असताना बँकेचा हजार रुपयांचा दंड कसा भरावा, हा प्रश्न सपनाला सतावत आहे. त्यामुळे आम्हाला मदतीचा धनादेश नको, त्याऐवजी रोख स्वरुपात मदत द्यावी तसेच बँकेने आकारलेल्या दंडाचीही रक्कम शासनाने द्यावी, अशी मागणी सपना इंगळे व तिचे वडील भास्कर हिवराळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.शासनाच्या बँक खात्यात पैसेच नाही!पती आणि त्यानंतर सासूही गेल्याने एकाकी झालेल्या सपनाच्या आधारासाठी तिचे वडील भास्कर हिवराळे सध्या तिच्याजवळच राहात आहेत. त्यांनीही स्टेट बँकेत जाऊन चेक वटविण्याचा प्रयत्न केला, मात्र पुरेसा पैसाच नसल्याच्या कारणावरून तहसीलदारांचा चेक बाउन्स होत आहे. विशेष म्हणजे, चेक बाउन्स झाल्याने धुणी भांडी करणाºया सपना इंगळे यांनाच बँकेने हजार रुपयांचा दंड लावला आहे.
आता धनादेश नको, रोख रक्कमच द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 9:50 PM
पालकमंत्री, तहसीलदार यांनी मोठ्या दिमाखात कार्यक्रम घेऊन गरीब लाभार्थ्यांना शासकीय मदतीचे धनादेश वाटले. पण ते शासकीय धनादेश चक्क तीन वेळा बाउन्स झाले. मदत वाटपाचा राजकीय ‘इव्हेंट’ पार पडला, पण लाभार्थ्यांच्या झोळीत काहीच पडले नाही.
ठळक मुद्देलाभार्थी विधवेचा टाहो : शासनाचा धनादेश तीन वेळा बाउन्स होऊनही प्रशासन सुस्तच