लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ३-४ वर्षांच्या मुला-मुलींसोबत बोलताना बरेचदा आपण चुकतो हे प्रथम पालकांनी मान्य केले पाहिजे. मुलांनी एखादी गोष्ट ऐकली नाही तर आपण त्यांना मारतो. मग मूल तोच धडा घेत मोठा झाल्यावर त्याची मते ऐकून न घेणाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, ही बाब पालकांनी मुलांच्या मनावर बिंबविली पाहिजे. मुलांना ‘ब्लार्इंड फालोअर्स’ बनवू नका, असा सल्ला डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी पालकांना दिला.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा होते. वायपीएसचे प्राचार्य डॉ. जेकब दास, प्री-प्रायमरीच्या प्राचार्य निहारिका प्रभुणे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विनोद गाबडा, जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी माजी प्राचार्य शंकरराव सांगळे, अॅड. अमरचंद दर्डा, माणिकराव भोयर, आनंदराव गावंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पालकांना मार्गदर्शन करताना डॉ. इंद्रजित खांडेकर म्हणाले, बालकांचे लैंगिक शोषण हा सध्याचा देशभरातील गहन प्रश्न आहे. जवळपास ५७ टक्के मुले आणि ४७ टक्के मुली या प्रकाराच्या बळी ठरत आहेत. दर १५ मिनिटाला एक अत्याचाराची घटना घडत आहे. त्यामुळेच आपल्या घरातले वातावरण चांगले आहे, आपल्या मुलांसोबत असे काही घडूच शकत नाही, या भ्रमातून पालकांनी बाहेर येण्याची गरज आहे. ज्या प्रमाणे आपली मुले सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे, त्याच प्रमाणे आपल्या मुलांकडून इतरांच्या मुलांवर अत्याचार होणार नाही, याचीही काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी १५ वर्षांनंतर आपल्या मुलाने चांगले वागावे असे वाटत असेल, तर आजपासूनच त्याला लैंगिक शिक्षण दिले पाहिजे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुलांना एकदा शाळेत नेऊन सोडले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे पालकांनी मानू नये.मुलांच्या योग्य संगोपनाची, त्याच्यावर योग्य संस्कार करण्याची आणि त्याच्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देण्याची जबाबदारी पालकांनी पार पाडलीच पाहिजे.जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, मुला-मुलींच्या भवितव्याविषयी पालक जागृत असतात. मात्र, त्यांच्या मनातील शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे. पालक आणि शाळा यांच्यातील नाते आपुलकीचे असले पाहिजे. मुलांना चांगले संस्कार मिळाले पाहिजे, या उद्देशाने डॉ. इंद्रजित खांडेकर यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रास्ताविक डॉ. जेकब दास यांनी केले. सूत्रसंचालन हर्षदा तत्ववादी यांनी केले. पहिल्या सत्रात अपर्णा बाजपेयी यांनी तर दुसºया सत्रात स्मिता कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेला पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.पालकांच्या प्रश्नांचे झाले समाधानकार्यशाळेत पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी निरसन केले. शाळेत मुलांकडून मुलींना त्रास देण्याचे प्रकार होत असल्यास काय करावे, असा प्रश्न पालकाने उपस्थित केला. त्यावर डॉ. खांडेकर म्हणाले, पालक आणि शिक्षकांनी एकत्र बसून यावर तोडगा काढला पाहिजे. आईवडीलांनी एकत्र बसून मुला-मुलींना एकत्र मार्गदर्शन करावे. मुलांना लैंगिकतेविषयी नेमकी कोणती माहिती द्यावी, असा प्रश्न एका महिला पालकाने उपस्थित केला. त्यावर डॉ. खांडेकर म्हणाले, अगदी पहिलीपासूनच माहिती दिली पाहिजे. मात्र सर्व माहिती एकत्र देऊ नये. सुरवातीला ‘बॉडी पार्ट्स’ची नावे, नंतर त्या अवयवांची स्वच्छता अशा पायरी-पायरीने माहिती देत जावे.
मुलांना ‘ब्लार्इंड फॉलोअर्स’ बनवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 10:06 PM
३-४ वर्षांच्या मुला-मुलींसोबत बोलताना बरेचदा आपण चुकतो हे प्रथम पालकांनी मान्य केले पाहिजे. मुलांनी एखादी गोष्ट ऐकली नाही तर आपण त्यांना मारतो. मग मूल तोच धडा घेत मोठा झाल्यावर त्याची मते ऐकून न घेणाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करतो.
ठळक मुद्देइंद्रजित खांडेकर : यवतमाळ पब्लिक स्कूलमधील कार्यशाळेत पालकांना कानमंत्र