यवतमाळ : लेखी आदेश असल्याशिवाय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी डीसीपीएस खाते काढू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पेन्शन बचाव शिक्षक कृती समितीने केले आहे. महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना अंशदान पेन्शन योजनेचे खाते उघडण्यासाठी आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांच्यावतीने मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षकांना लेखी सूचना द्याव्या, असे पत्र देण्यात आले. त्यामुळे १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकाचे किंवा प्राचार्याचे लेखी आदेश असल्याशिवाय अंशदान पेन्शन योजनेचे (डीसीपीएस) खाते काढू नये, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. शासनाने अंशदान पेन्शन योजनेचे खाते काढण्यासाठी ११ डिसेंबर २०१५ तसेच विभागीय आयुक्त यांनी २६ फेब्रुवारी २०१६ ला काढलेल्या पत्रकानुसार २००५ नंतरच्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी अंशदान पेन्शन योजनेचे खाते काढण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार वेतन पथक अधीक्षकांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्यांसाठी सूचनापत्र काढले. डीसीपीएसचा खाते नंबर आल्यावरच कर्मचाऱ्यांच्या दोन कपाती होणार असल्याने मुख्याध्यापकांनी खाते काढण्याकरिता लेखी आदेश द्यावा, तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांनी लेखी आदेश मिळाल्यानंतरच खाते काढायचे किंवा नाही याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पेन्शन बचाव शिक्षक कृती समितीचे संजय येवतकर, संतोष पवार, प्रफुल्ल गावंडे, योगेश चव्हाण, चंद्रशेखर पाटील, प्रफुल्ल वानखेडे, आशिष दंडावार, पीयूष भुरचंडी, प्रवीण जिरापुरे, विनोद चिरडे, गोपाल बोरले, प्रफुल्ल वराडे, किशोर बोंडे, भूपेंद्र देरकर, किशोर भेदोडकर, सुशील माळपेल्लीवार, रणधीर किनाके, स्वप्नील इंगोले, विजय बिहाडे, विजय आणेवार आदींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
आदेशाविना ‘डीसीपीएस’ खाते काढू नये
By admin | Published: July 18, 2016 1:02 AM