यवतमाळ : गणरायाला प्रसाद म्हणून वाटले जाणारे मोदक आता विविध प्रकारात बाजारात दाखल झाले आहेत. दूध उत्पादक कंपन्यांनी मागणी लक्षात घेता मोदकाचे विविध प्रकार बाजारात आणले आहेत. यात उकडीच्या मोदकाला सर्वाधिक मागणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत मोदकाच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. मात्र काही प्रमाणात मोदकाचा आकार कमी झाला आहे. यासोबतच मोदक बनविण्यासाठी विविध कौशल्याचा वापर करण्यात आला आहे.
चॉकलेट मोदकही आले मोदकाची मागणी लक्षात घेता व्यावसायिकांनी मोदक बनविण्याचे नानाविध प्रकार बाजारात आणले आहेत. यामध्ये काजू मोदक, मलाई मोदक, खोबरा मोदक, उकडीचे मोदक, गूळ खोबऱ्याचे मोदक, पुरण मोदक यासह चॉकलेट मोदकहीं बाजारात विक्रीसाठी आले आहेत.
साईज झाली प्रभावित मोदकाच्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य महागले आहे. मात्र यानंतरही गणेश भक्तांच्या खिशाला झळ पोहोचू नये म्हणून मोदकाच्या किमती कायम ठेवण्यात आल्या आहेत. यात मोदकाची साईज मात्र कमी करण्यात आली आहे.
गूळ खोबऱ्याच्या मोदकाला मागणी बाजारात गूळ आणि खोबरे यापासून तयार झालेल्या मोदकाला सर्वाधिक मागणी आहे. मोदक बनविण्यासाठी साचाचा वापर करण्यात आला आहे. गूळ, खोबरे आणि कणिकपासून बनवलेले मोदक बाजारात आहे.
मोदकाचे दर काय बाजारात सर्वाधिक २०० रूपये दर काजू मोदकाला आहे. मलाई मोदक १५०, खोबरा मोदक १००, गूळ खोबरा मोदक १२० रूपये, उकडीचे मोदक ३० रूपये नग दराने विकले जात आहे.
मोदक विक्रेते म्हणतात.... "ग्राहकांच्या मागणीनुसार मोदकाचे विविध प्रकार तयार केले जातात. यात अधिकाधिक गुणवत्ता देण्यावर भर देण्यात आला आहे. दर मात्र जैसे थेच ठेवण्यात आले आहेत." - भालचंद्र रानडे, यवतमाळ