लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाच्या काळात डॉक्टरला रुग्णाची आणि रुग्णाला डॉक्टरची भीती अशी स्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टर कोणत्याही रुग्णावर उपचार करून आपली सेवा बजावायला घाबरत नाहीत. मात्र या सेवेनंतर कुठे काही कमी जास्त घडल्यास गैरसमजातून रुग्णाच्या नातेवाईकांकडून धुमाकूळ घातला जातो, रुग्ण पॉझिटिव्ह असेल तर संपूर्ण यंत्रणा क्वारंटाईन करून हॉस्पिटल सील केले जाते. याबाबींची डॉक्टर मंडळींनी धास्ती घेतली असल्याचा सूर यवतमाळ शहरातील डॉक्टरांनी व्यक्त केला.वडगाव स्थित पुष्पकुंज सोसायटीतील शिफा हॉस्पिटलचे संचालक डॉ. मुश्ताक शेख यांचे गुरुवारी पहाटे हृदयाघाताने निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी उपचार मिळावा म्हणून दोन रुग्णालयांचे दरवाजे ठोठावले. मात्र कुणीही त्यांना एन्ट्री दिली नाही किंवा उपचार केले नाही. त्यात अर्धा ते पाऊण तास निघून गेल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. खुद्द डॉक्टरलाच उपचारासाठी भटकंती करावी लागते हे चित्र पाहून जनतेत वैद्यकीय क्षेत्राबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांचेच उपचाराबाबत हे हाल असेल तर सामान्य नागरिकांचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. यानिमित्ताने यवतमाळ शहरातील काही डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी अधिकृतपणे पुढे येऊन प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांच्या अडचणी मात्र त्यांनी आवर्जुन सांगितल्या.बहुतांश डॉक्टरांचा उमटलेला सूर असा की, डॉक्टर २४ तास सेवा देण्यासाठी तत्पर असतात. आता कोरोना संसर्गाच्या काळात मात्र डॉक्टरांनी काही अटी, शर्ती ठेवल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका थांबविण्यासाठी त्या आवश्यकही आहे. यामुळे इतर आजारांच्या रुग्णांना अडचणी येत आहेत. गंभीर प्रकृती असलेले रुग्ण वेळेत पोहोचूनही उपचार मिळेलच याची शाश्वती नाही. कोरोना संसर्गाबाबत अनेक समज-गैरसमज पसरले आहेत. लक्षणे नसणारीही व्यक्ती पॉझिटिव्ह येते, तर गंभीर लक्षणे असूनही निगेटिव्ह रिपोर्ट येतो. अशा स्थितीत डॉक्टरांबाबत आक्षेप घेतले जातात. त्यामुळे डॉक्टरांनाही आता रुग्णांची भीती वाटायला लागली आहे. डॉक्टर आजाराला घाबरत नाहीत, मात्र गैरसमजातून रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकाकडून होणाऱ्या उद्रेकाची धास्ती आहे. कोरोनाच्या काळातही प्रत्येक डॉक्टर इतर आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २४ तास हजर आहेत. अशाच रुग्णांच्या संरक्षणासाठी रुग्णालयात येणाºया प्रत्येकाला एका प्रक्रियेतून जावे लागते. एखादा पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यास पूर्ण हॉस्पिटलची व्यवस्था विस्कळीत होते. याचा परिणाम उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना सोसावे लागतात. त्यामुळे कोविडच्या काळात नवीन रुग्ण आल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी करूनच प्रवेश दिला जातो. यामुळे डॉक्टरांबाबत रुग्णांमध्ये गैरसमज पसरत आहे. कोविडच्या काळात रुग्णही डॉक्टरांकडे जाण्यास घाबरत आहे. ही परिस्थिती डॉक्टर व रुग्णांसाठी परीक्षा घेणारी आहे. कोविडमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत प्रत्येकानेच संयमाने काम घेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली.डॉक्टरलाच डॉक्टर मिळू नये ही घटना दुर्दैवीडॉक्टरच रुग्ण बनून आल्यानंतर त्याला उपचारासाठी डॉक्टर मिळू नये, ही दुर्दैवी घटना आहे. यासाठी कुणावर आरोप करता येणार नाही. मात्र कोरोना काळात उद्भवलेली स्थिती यातून लक्षात येते. डॉक्टर व रुग्ण हे विश्वासाचं नातं आहे. त्यात गेल्या काही दिवसात तडा गेल्याचे चित्र पहावयास मिळते. डॉ. मुश्ताक शेख या प्रॅक्टिशनर डॉक्टरचा उपचाराअभावी मृत्यू झाला. याची सल सर्वच डॉक्टरांना आपल्या पद्धतीने व्यक्त केली.
डॉक्टर रुग्णाला अन् रुग्ण डॉक्टरला घाबरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 5:00 AM
वडगाव स्थित पुष्पकुंज सोसायटीतील शिफा हॉस्पिटलचे संचालक डॉ. मुश्ताक शेख यांचे गुरुवारी पहाटे हृदयाघाताने निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी उपचार मिळावा म्हणून दोन रुग्णालयांचे दरवाजे ठोठावले. मात्र कुणीही त्यांना एन्ट्री दिली नाही किंवा उपचार केले नाही. त्यात अर्धा ते पाऊण तास निघून गेल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : डॉक्टर म्हणतात, आजाराची भीती नाही, उपचाराची तयारी, पण संभाव्य उद्रेकाची धास्ती