येरावार दाम्पत्याचे औदार्य : मदतीसाठी नेहमी जातात धावूनराजेश पुरी । लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : त्यांना गुडघ्याचा आजार आहे. चालताही येत नाही. या उपचारासाठी डॉक्टरांनी पाच लाखाचा खर्च सांगितला. एवढी मोठी रक्कम स्वत:च्या उपचारावर खर्च करणे त्यांनी विनम्रपणे नाकारले आणि म्हणाल्या, एवढ्या पैशातून पाच संसार उभे करू या. केवळ स्वत:पुरता विचार न करता सदैव दुसऱ्याच्या मदतीसाठी जगणाऱ्या येथील येरावार दाम्पत्याचे औदार्य परिसरात आदर्शाचा विषय झाला आहे.वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत विद्यादानाचे पवित्र कार्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडले. पगारातील पैशाचा काटकसरीने वापर करीत पै पै जमा केले. ही रक्कम आता गोरगरीबांच्या कल्याणासाठी, शिक्षणासाठी उदार अंतकरणाने खर्च करण्याच काम उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील सेवानिवृत्त शिक्षक जनार्दन नागोराव येरावार आणि त्यांच्या पत्नी प्रमिलाताई जनार्दन येरावार हे दाम्पत्य करीत आहेत. हाडाचे शिक्षक असलेले हे दाम्पत्य जणू काही जोतिबा आणि सावित्री. नोकरीच्या काळात जेथे केले ते गाव त्यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने जिंकले. परिवारातील सख्ख्या-चुलत्यांनाही हातभार लावण्याची काळजी आयुष्यभर घेतली. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात महिना ८० रुपये पगार. फाजील खर्च टाळत पैशाची बचत केली. दोन मुले आणि दोन मुलींचे उत्तम संसार उभे केले. पण रक्तात भिनलेला दातृत्वाचा गुण स्वस्थ बसू देईना. कोणी गोरगरीब दिसला की दातृत्वाचा हात पुढे. ढाणकीतील अत्यंत गरीब पाच मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी लाख-लाख रुपये बँकेत टाकली आहे. बंदी भागातील एक गरीब मुलगा पैशाअभावी डॉक्टरकीच्या शिक्षणापासून वंचित राहात होता. जनार्दनरावांना ही माहिती मिळाली. त्यांनी मदतीचा हात दिला. आज तो मुलगा एमबीबीएस झाला आहे. जनार्दनराव आणि प्रमिलाताई दोघेही स्वाध्यायी. पांडुरंगशास्त्रींच्या शिकवणूकीचा त्यांच्यावर प्रभाव. आध्यात्मावर प्रचंड श्रद्धा पण अंधश्रद्धेचा तेवढाच तिटकारा. देवाची पूजा करतात. मात्र नैवेद्य देवाला नाही तर गोरगरीबाला जेवणाचा डबा देतात. जनार्दनरावांचा गत आठवड्यात ८० वा वाढदिवस होता. हे औचित्य साधून त्यांनी २१ हजाराची देणगी मोक्षधामाला दिली. खिलाडूवृत्तीचे दानशूर दाम्पत्य परिसरात आदर्श ठरले आहे. त्यातच प्रमिलाताईला गुडघ्याचा आजार झाला. डॉक्टरांनी पाच लाख रुपये खर्च सांगितला. मात्र उपचार करण्याऐवजी या पैशातून पाच जणांचे संसार उभे करण्याचा निर्णय घेतला. केवळ स्वत:पुरता विचार न करता दुसऱ्यांसाठी जगणारे हे दाम्पत्य म्हणजे औदार्याचे मूर्तिमंत उदाहरण होय.संक्रांतीला अनोखे वाणप्रमिलाताई येरावार दरवर्षी संक्रांतीला वाण देतात. परंतु दरवर्षी वाणाच्या रूपाने गोरगरीबांना उपयुक्त अशा वस्तूंचे वाटप करतात. या वाणात त्यांनी ब्लँकेट, चादरी, साड्या, सतरंज्या, मणी मंगळसूत्र वाटप केले आहे. एका कष्टकरी महिलेला त्यांनी दीड तोळ्याचा नेकलेसही अर्पण केला. आर्यवैश्य मंगल कार्यालयात एक खोलीही बांधून दिली.
उपचाराची रक्कम केली गोरगरीबांना दान
By admin | Published: May 25, 2017 1:23 AM