यवतमाळ : दारूसाठी ५० रुपये दिले नाही म्हणून एका व्यक्तीचा धारदार चाकूचे वार करून खून झाला होता. वडगाव येथील मोक्षधाम परिसरात घडलेल्या या घटनेत मारेकऱ्याविरुद्ध दोष सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेप आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्याचा निकाल येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. बारणे यांच्या न्यायालयाने दिला. आकाश उर्फ डोम्या अरुण नेवारे (२२) रा. मोक्षधाम वडगाव असे शिक्षा झालेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. त्याने २७ जुलै २०१३ ला दुपारी २ वाजता शेजारील वामन दामोधर जुमनाके (५५) याला दारूसाठी ५० रुपये मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर संतप्त झालेल्या डोम्याने वामनवर धारदार चाकूने हल्ला केला. त्यामध्ये वामनच्या शरीराला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला होता. घटनेनंतर पत्नी छबूताई जुमनाके यांच्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी डोम्या याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. हा खटला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. बारणे यांच्या न्यायालयापुढे चालला. सुनावणीदरम्यान अनेक साक्षी तपासण्यात आल्या. त्यामध्ये मुलाची आणि शेजारील तिघांची साक्ष महत्वाची ठरुन दोष सिद्ध झाला. त्यावरून न्यायालयाने आरोपी डोम्या याला जन्मठेप, ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील अॅड. संदीप दर्डा यांनी युक्तीवाद केला. (स्थानिक प्रतिनिधी)
दारूच्या ५० रूपयांसाठी खून करणाऱ्या ‘डोम्या’ला जन्मठेप
By admin | Published: November 06, 2014 2:17 AM