लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफपुढे पीपीई कीट हा एकमेव पर्याय होता. पीपीई कीट घालून काम करणे अत्यंत कठीण असल्याचे दिसून आले. पण, पर्याय नसल्याने सर्वांचा नाईलाज होता. अनेकजण धोका पत्करून पीपीई कीट न घालता वॉर्डात जात होते. आता यवतमाळच्या युवा संशोधकाने पीपीई कीटला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ‘डोरा’ (डायरेक्ट ऑपरेटिंग रेस्पॅरिटी ऑपरेट्स) हे डिव्हाईस परिधान करून कोविड वार्डात मोकळा श्वास घेता येणार आहे.डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफशिवाय घाणीच्या ठिकाणी काम करणारे सफाई कामगार, व्यावसायिक यांनाही ‘डोरा’चा प्रचंड फायदा होणार आहे. यवतमाळातील संशोधक आकाश गड्डमवार यांनी हे युनीट तयार केले.
कोविड काळातील कोरोना योद्ध्यांचे हाल पाहून आकाश यांनी संशोधन सुरू केले. त्यांना यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सागर गड्डमवार यांचे मार्गदर्शन लाभले. इशान धर, मुकुंद पत्रिका या दोघांनी सहाय्य केले. गायरो ड्राईव्ह मशनरिज प्रा.लि. या कंपनीचे संचालक म्हणून आकाश काम करतात. त्यांना सामविद इंटरनॅशनल नागपूर या संस्थेनेही सहाय्य केले. यातून परिपूर्ण असे ‘डोरा’ डिव्हाईस तयार झाले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील चमूने या डिवाईसची उपयोगीता व तांत्रिक बाबी तपासल्या. बधिरीकरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली शेडगावकर यांच्या नेतृत्त्वातील समितीने त्याला मान्यता दिली. आता या डिव्हाईसला सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.यापूर्वी आकाश यांनी कमी किमतीचा पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केला होता. अचानक वाढलेल्या व्हेंटिलेटरची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांच्या संशोधनातून झाला. त्याला चंदीगडच्या संस्थेने मान्यता दिली होती.
असे आहे ‘डोरा’ डिव्हाईस
बॅटरी ऑपरेटेड ३५० ग्रॅम वजनाचे हे डिव्हाईस कमरेला सहज बांधून शुद्ध ऑक्सिजन मिळविता येतो. पीपीई कीटप्रमाणे शरीराचा संपूर्ण भाग झाकलेला नसतो. चेहरा, नाक, डोळे व तोंड यामुळे सुरक्षित ठेवता येतात. घाम येत नसल्याने थकवा जाणवत नाही. शुद्ध ऑक्सिजन मिळत असल्याने कार्यक्षमता आपोआपच वाढते.