यवतमाळ : येथील आर्णी मार्गावर पल्लवी लॉनसमोर वर्चस्वाच्या लढाईतून धारदार शस्त्राने घाव घालून दोघांची हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री १०.३० वाजता घडली. या प्रकरणात काही तासातच नेताजी नगरातील पुढाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
वसीम पठाण दिलावर पठाण (३६, रा. नेताजीनगर), उमेश तुळशीराम येरमे (३४, रा. नेताजीनगर) अशी मृतांची नावे आहेत. आरोपी नीरज ओमप्रकाश वाघमारे (३३, रा. मधुबन सोसायटी, धामणगाव रोड), छोटे खान अन्वर खान पठाण (५४), शेख रहेमान शेख जब्बार (२८, दोघेही रा. नेताजीनगर), नितीन बाबाराव पवार (२४, रा. वडगाव) यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी रात्रीच अटक केली.
मृतक वसीमची पत्नी निखत पठाण हिच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम पठाण याचा महिनाभरापूर्वी नीरज वाघमारेच्या कार्यालयासमोर शेख रहेमान याच्याशी वाद झाला होता. तेव्हा नीरज वाघमारेने वसीमला समजावून सांग नाही तर त्याचा काटा काढतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर १५ दिवसांनी वसीम पठाण याने छोटू खान याच्याशी वाद घातला. तेव्हाही छोटू खान याने वसीमला संपविण्याची धमकी दिली.
नीरज व छोटू खान यांनी कट रचून शेख रहेमानच्या हाताने हे हत्याकांड घडवून आणले, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. शहरात दुहेरी हत्याकांडाची वार्ता पसरताच खळबळ निर्माण झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, एलसीबीचे प्रमुख प्रदीप परदेशी यांनी घटनास्थळाला भेट दिली.
मृतक वसीम पठाण हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करायचा. २०१७ मध्ये एलसीबीने वसीमच्या घरून मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यावेळी एक पिस्तूल व तीन तलवारी सापडल्या होत्या.
...असे घडले हत्याकांड
वसीम पठाण याला फोन करून भांडण मिटविण्यासाठी बोलावण्यात आले. शेख रहेमान, वसीम पठाण, उमेश येरमे, नीलेश उईके, नितीन पवार व विधीसंघर्षग्रस्त बालक हे सहा जण दोन दुचाकीवरून आर्णी मार्गावरील एका बारमध्ये दारू प्यायले. नंतर जेवण करण्यासाठी आर्णी मार्गावरील एका ढाब्यावर गेले. जेवतानाच वसीम व रहेमानमध्ये वाद झाला. नंतर उमेश येरमे हा चालत वनवासी मारोती परिसरात आला. उमेशला शोधण्याासाठी वसीम व रहेमान एकाच दुचाकीवरून आले. पल्लवी लॉनसमोर रहेमान आणि उमेश यांच्यामध्ये झटापट झाली. तेवढ्यात मागून रहेमानचे तीन साथीदार दुचाकीने पोहोचले. लोखंडी राॅडने उमेशवर हल्ला चढवत त्याला संपविण्यात आले.
हे पाहून वसीमने तेथून पळ काढला तर पाठलाग करून त्याच्यावरही सपासप वार करण्यात आले. यावेळी वसीमच्या कंबरेलाही धारदार चाकू खोचलेला होता. मात्र, तो त्याला काढण्याची संधीच मिळाली नाही. नंतर आरोपी तेथून पसार झाले. त्यांनी नांदगाव खंडेश्वर (जि. अमरावती) येथील खंडाळा या गावात आश्रय घेतला. त्यांना ठाणेदार मनोज केदारे यांच्या निर्देशावरून पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे व त्यांच्या पथकाने अटक केली, तर दर्शन दिकोंडवार यांनी नीरज वाघमारे व छोटे खान या दोघांना ताब्यात घेतले.
सहा वर्षांनंतर नवरात्रातच हत्याकांड
२०१५ मध्ये नवरात्रीच्या दरम्यानच मच्छीपूल परिसरात तिहेरी हत्याकांड घडले होते. त्यानंतर, आता नवरात्रातच आर्णी रोडवर दुहेरी हत्याकांड घडले आहे. नवरात्रीच्या काळात शहरात भाविकांची वर्दळ असते. पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त असते. अशा स्थितीत अंतर्गत धुसफूस सुरू असलेल्या गटांमध्ये संपविण्याचे प्रयत्न केले जातात.