महागाव : इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे, असे निर्देश हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी यवतमाळ व नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील कळमनुरी, उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता शेती, सिंचन आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे निर्देश खासदार पाटील यांनी दिले. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. बिपिन इटनकर यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात झळा जाणवत आहे. त्यामुळे मतदारसंघातील अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
या तिन्ही जिल्ह्यांची जीवनवाहिनी म्हणून इसापूर धरणाकडे पाहिले जाते. त्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. मतदारसंघातील कळमनुरी, उमरखेड, महागाव, हदगाव आणि हिमायतनगर, किनवट व माहूर या भागांतील जनतेला आणि शेतीला पाणीपुरवठा इसापूर धरणातून होतो. आता पाणीटंचाईजन्य स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पाणी सोडण्यात येते. परंतु यंदा मार्च महिना संपला तरी पाणी सोडले नाही. त्यामुळे शेतकरी व सर्व सामान्यांचे हाल होत आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन तत्काळ इसापूर धरणातून पाणी सोडण्याचे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड आणि यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
बॉक्स
जीवनदायीनी पूस नदीही आटली
महागाव येथून वाहणारी पूस नदी पूर्णपणे आटली आहे. नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्या पाण्यात विविध प्रकारचे विषाणू तयार झाले आहे. पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या नाळातून सूक्ष्म विषाणू बाहेर पडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षी महागाव पंचायत समितीने तालुक्यातील करंजखेड गावात विहीर अधिग्रहण केले होते. त्याची रक्कम आजपावेतो भेटली नाही. यासंदर्भात सरपंच प्रवीण ठाकरे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरूच ठेवला आहे.