लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक नगरपरिषदेला उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. मात्र पांढरकवडा नगरपरिषदमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे काम अंत्यत संथगतीने सुरू असल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पांढरकवडा नगरपरिषदेला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात २२० घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी केवळ ८६ घरकुलांचे काम सुरू करण्यात आले असून हे काम अद्यापही रखडले आहे. सन २०१९-२० करिता २०० घरकुलांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सन २०१९-२० मधील मंजुर घरकुलांपैकी एकाही घराचे काम अद्याप सुरू झाले नाही. मुळात ही योजना गरिबांसाठी आहे किंवा नाही, यावरच प्रश्नचिन्ह आहे. कारण या योजनेअंतर्गत बांधकामाचा पैसा हा पाच टप्प्यात लाभार्थ्याला दिला जातो.एक एक टप्पा पूर्ण झाल्याची पाहणी केल्यानंतर पैशांचा चेक दिला जातो. परंतु नगरपरिषदेकडे या योजनेअंतर्गत निधी नसल्याने गरिब नागरिक आपापल्या झोपड्या पाडून पक्के घर मिळेल, या आशेने चेकची वाट पाहत आहेत. परंतु रक्कम मिळत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. एवढेच नव्हे तर बांधकाम करण्याकरिता तोडलेले झोपडीवजा घर अपूर्ण असल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. उसणवार, उधार करून काहींनी घराचे काम तर चालू केले.परंतु पहिल्याच टप्प्यात जास्त पैसा लागत असल्याने व नगरपरिषदेकडून वेळेवर पैसे न मिळाल्याने काम अर्ध्यावर रखडले आहे. त्यामुळे हे लाभार्थी घर सोडून बेघर झाले आहेत.त्यांचे पक्क्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. या योजनेअंतर्गत पांढरकवडा नगरपरिषदेत सन २०१८-१९ मध्ये २२० घरकुल व सन २०१९-२० मध्ये २०० असे एकूण ४२० पात्र लाभार्थी आहेत. मात्र यापैकी सन २०१८-१० मधील २२० पैकी ८६ घरकुलांचे बांधकाम सुरू करण्यात आले आणि अद्यापही पूर्ण झाले नाही, तर उर्वरित ३३४ पात्र लाभार्थ्यांच्या घरकुल बांधणीस अद्यापही सुरूवात झाली नाही. यामुळे २०२२ पर्यंत सर्व कुटुंबांना घर देण्याचे मोदी सरकारचे स्वप्न कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. योजना तर आली. परंतु निधी अजूनही अप्राप्त आहे.निधीअभावी घरांचे काम राहिले अर्धवटशासनाने पहिल्या टप्प्यातील निधी लाभार्थ्यांना दिला. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली जुनी घरे पाडून नवीन घराच्या बांधकामाला सुरूवात केली आहे. मात्र आता निधी उपलब्ध न झाल्यामुळे घराचे काम अर्धवटच राहिले आहे.विधानसाभा निवडणूक व त्यानंतर दिवाळीच्या सुट्या आल्यामुळे नगरपरिषदेला निधी उपलब्ध झाला नाही. यापूर्वी जेवढा निधी आला तो लाभार्थ्यांना देण्यात आला. यानंतर आता येणारा निधी हा उर्वरित लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.- अश्विनी वासेकर,अभियंता, प्रधानमंत्री आवास योजना.
गरिबांच्या घरकुलांचे स्वप्न अधुरेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:00 AM
प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक नगरपरिषदेला उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. मात्र पांढरकवडा नगरपरिषदमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे काम अंत्यत संथगतीने सुरू असल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देपंतप्रधान आवास योजना : पांढरकवडा नगरपरिषदेचे काम संथगतीने