१० कोटींची मागणी : १७ योजना अपूर्णच, पाणीपुरवठा विभाग हतबललोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निधीअभावी जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजलच्या १७ योजना अर्ध्यावरच रखडल्या आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाणीपुरवठा विभागाने १० कोटींची मागणी केली आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ४६ गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू होते. तीव्र पाणीटंचाई असल्याने या गावांमध्ये या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र निधीअभावी त्या पूर्ण करणे कठीण झाले. अशाही स्थितीत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने २९ गावांमधील योजना पूर्ण केल्या. मात्र आता उर्वरित गावांमधील काम करण्यासाठी निधीच उरला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग हतबल झाला आहे.योजना सुरू असलेल्या १७ गावांमध्ये काम सुरू आहे. तथापि निधी नसल्याने अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. या योजना पूर्ण करण्यासाठी किमान १० कोटींची गरज आहे. पाणीपुरवठा विभागाने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. मात्र राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी उपलब्ध करून घ्यावा, असे सूचविले आहे. त्यानुसार आता पाणीपुरवठा विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे १० कोटींच्या निधीची मागणी केली. मात्र जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल कधी, निधी मंजूर कधी होणार, असा प्रश्न आहे. पाणीपुरवठा विभागाने नियोजन समितीकडे १० कोटींची मागणी केली. मात्र नियोजन समितीच अस्तित्वात नाही. येत्या आॅगस्टमध्ये नियोजन समितीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या १७ योजना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध होईल. त्यानंतर तरी किमान पुढील उन्हाळ्यापूर्वी या १७ गावांमधील योजना पूर्ण व्हाव्यात, अशी तेथील जनतेची अपेक्षा आहे.
पेयजल योजना रखडल्या
By admin | Published: July 17, 2017 1:43 AM