लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : गेल्या १५ वर्षांपासून दुष्काळग्रस्त असलेल्या ससाणी गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. येथील आबालवृद्धांनी अखंड श्रमदान केले. नातेवाईकांचे लग्न, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून आता पाणी डोळ्यात नाही गावात पाहू या, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकजण राबला. या श्रमाला फळ आले असून पहिल्या पावसानेच कधी नव्हेइतकी जलपातळीत वाढ झाली आहे. विहिरी तुडूंब भरल्या आहेत.नाला खोलीकरण, एलबीएस, सीसीटी, डीप सीसीटी, गॅबियन, शोषखड्डे, शेततळी, साखळी शेततळे, बांधबंधिस्ती करून पाणी मुरविण्यात आले. निसर्गाच्या कृपेने पाणी साठविण्यासाठी केलेले सर्व उपचार फळाला आले आहे. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर श्रमसाफल्याचा पाणीदार आनंद ओसंडून वाहत आहे. गावाने जर मनात ठरविले की आपली समस्या आपणच सोडवायची तर राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला ग्रामविकास व्हायला वेळ लागणार नाही. श्रमदानाच्या या महाकुंभात जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसिल, कृषीविभाग, सहकारी संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि व्यवस्थापन समिती, समाजसेवी संस्था, पत्रकार बांधव , सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक संघटना, व्यापारी-अडते संघटना, मेडिकल असोसिएशन, जलमित्र, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी संघटना, महिला संघटना आदींनी श्रमदान केले.अडीच लाखांचे कर्ज घेऊन कामससाणीवासियांनी आपल्या गावाची दुष्काळी समस्या कायमस्वरुपी मिटविण्यासाठी गाठीला पैसे नसतांना अडीच लाख रुपये कर्ज काढून साखळी शेततळ्याची निर्मिती केली. स्पर्धेत नंबर येवो अथवा न येवो परंतु येणाऱ्या उन्हाळ्यात आमचे ससाणी गांव हे टँकरमुक्त झाले पाहिजे, हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस असेल, असा दृढनिश्चिय ग्रामस्थांनी केला होता.
दुष्काळी ससाणी गाव बनले पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:53 PM