एसडीपीओंच्या धाडीने भंडाफोड : वर्धेत तस्करी, दोघांविरुद्ध गुन्हा यवतमाळ : चक्क नाल्याचे पाणी वापरून गावठी दारूची निर्मिती केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या पथकाने घातलेल्या धाडीत बाभूळगाव तालुक्यात उघड झाला आहे. या प्रकरणी सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बाभूळगाव तालुक्याच्या पाचखेड येथील सतीश जगताप यांच्या शेतातील नाल्यामध्ये गावठी दारुचा हा कारखाना सुरू होता. तेथेच गावठी दारुची निर्मिती, विक्री व लगतच्या दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह््यात त्याची तस्करी केली जात होती. एसडीपीओ पीयूष जगताप यांना याची खबर मिळताच त्यांनी आपल्या पथकासह तेथे धाड घातली. तेथे प्रत्येकी ५० लिटर दारूचे २५ ड्रम, एक हजार २५० लिटर मोहा माच, प्लास्टिक डबक्या, दारू असा एक लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सतीश बाबाराव जगताप (४५) रा. पाचखेड व अरुण पांडुरंग खोब्रागडे (४०) रा. मुबारकपूर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष असे नाल्याच्या पाण्यात तयार केली जाणारी ही दारू दुर्गम ठिकाणी व चक्क नालीमध्ये लपवून ठेवली जात असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले. या धाड पथकात जमादार अजय डोळे, पोलीस शिपाई बबलू चव्हाण, प्रमोद मडावी, विजय जाधव, विकास करमनकर, कुणाल पांडे, संजय कांबळे, परेश मानकर आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
नाल्याच्या पाण्यावर गावठी दारूची निर्मिती
By admin | Published: April 13, 2017 12:53 AM