रुग्णांचे हाल : रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य दिग्रस : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध साधन सामग्री अभावी रुग्णांचे हाल होत असून रुग्णालयाला घाणीचा विळखा पडला आहे. कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाने रुग्णांना थेट यवतमाळला जाण्याचा सल्ला दिला जातो. दिग्रस येथील रुग्णालयाला १९९९ मध्ये ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर २५ कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली. एक्स-रे मशीन, रुग्णवाहिका, ईसीजी मशीन देण्यात आले. परंतु येथील रुग्णालयाला मनुष्यबळ पुरविण्यात आले नाही. परिणामी येथील अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रापेक्षाही वाईट झाली आहे. रक्तसंकलन सुविधा नसल्याने रुग्णांना यवतमाळ गाठावे लागते. सोनोग्राफी मशीनही येथे नाही. त्यामुळे गरोदर मातांना खासगीतून सोनोग्राफी करून आणावी लागते. वैद्यकीय अधिकारी रुग्णालयाकडे फिरकतच नाही. ग्रामीण रुग्णालयाचा परिसर मोठा आहे. परंतु सर्वत्र केरकचरा आणि घाणीचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे डासांची उत्तपत्ती वाढली असून पावसाळ्यात डास प्रतिबंधासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. सध्या शहरासह ग्रामीण भागात विषमज्वर, मेंदूज्वर, मलेरिया, कावीळ, डेंग्यू सदृश आजार डोकेवर काढत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात २४ तास सेवा देणे गरजेचे आहे. परंतु रुग्णाच्या प्रमाणात खाटांची संख्या अपुरी पडत असून रुग्णांना जमिनीवर झोपून दिवस काढावे लागत आहे. अनेकदा तर किरकोळ आजारासाठी यवतमाळला पाठविले जाते. रुग्णालयात औषधींचा साठा भरपूर आहे. परंतु अल्पप्रमाणात वाटप केले जाते. अनेकदा रुग्णांना बाहेरुन औषधी विकत आणावी लागते. याबाबत कुणी चौकशी केलीच तर त्याच्याशी अपमानास्पद बोलले जाते. रुग्णालयाचा हा ढेपाळलेला कारभार कधी सुधारेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णांना मात्र कोणताही दिलासा मिळत नाही. (शहर प्रतिनिधी)
दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराचीच वाणवा
By admin | Published: August 03, 2016 1:34 AM