लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील गोरगरिबांच्या आरोग्याची जबाबदारी वाहणारे येथील ग्रामीण रुग्णालयच स्वत: खस्ताहाल भोगत आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा अभाव असून साधे पिण्याचे पाणीही रुग्णालयात मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेनेच याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.१९९९ पासून दिग्रस शहरात ग्रामीण रुग्णालय निर्माण करण्यात आले. रुग्णालयाला भव्य परिसर लाभला आहे. मात्र या परिसरात केरकचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मोकळ्या परिसराचा रुग्णांना लाभ होण्याऐवजी तेथील दुर्गंधी आणि डासांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. डासप्रतिबंधक औषधी फवारणे गरजेचे असतानाही त्याबाबत हलगर्जीपणा केला जात आहे.सध्या शहरासह संपूर्ण तालुक्यात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळत आहे. त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात २४ तास सेवा उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु रुग्णांच्या प्रमाणात ग्रामीण रुग्णालयात खाटांची संख्या अपुरी पडत आहे. बरेचदा रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार केले जातात. किरकोळ आजार किंवा साधा ताप असला तरी रुग्णांना थेट यवतमाळची वाट दाखविली जात आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना उपचारापासून मुकावे लागत आहे. ग्रामीण रुग्णालयातच २४ तास आकस्मात सेवा पुरविणे आवश्यक आहे. परंतु या सुविधेअभावी ग्रामीण तथा शहरी रुग्णांनाही त्रास सहन करावा लागत आहे.येथील ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे मशीन कित्येक दिवसांपासून धूळ खात पडली आहे. रुग्णवाहिका असली तरी बरेचदा ती रुग्णांना उपलब्ध होत नाही. ईसीजी व सोनोग्राफी मशीनही बंदच आढळते. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक कधी येतात तर कधी आठ ते पंधरा दिवस गायब असतात. तर वैद्यकीय अधिकारी नेहमी स्वत:च्या दवाखान्यातच व्यस्त असतात. ते फक्त नावापुरते ग्रामीण रुग्णालयात नोकरी करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. ग्रामीण रुग्णालयात कसेबसे १५ मिनिट वेळ देऊन स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये निघून जातात. हे चित्र ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना बघून गप्प बसावे लागते. येथील गरजू रुग्णांना चक्क खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या एकंदरच कारभाराविषयी रोष आहे.महागड्या औषधांसाठी गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंडदिग्रस ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधांचा साठा योग्य प्रमाणात आहे. तरीसुद्धा त्या औषधांचा रुग्णांना लाभ दिला जात नाही. महागडी औषधे बाजारातून विकत आणायला लावली जातात. ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण दुर्बल आर्थिक घटकातीलच असतात तरीही त्यांना उसणवारी करून औषधी खरेदी करावी लागत आहे. विशेष म्हणजे, येथील डॉक्टर सकाळी ८ वाजताची ड्युटी असतानाही १० वाजता येतात. त्यामुळे रुग्णालयाचा कारभार पूर्णपणे ढेपाळल्याचे दिसत आहे. त्याचा थेट फटका तालुक्यातील गरजू रुग्णांना सहन करावा लागत आहे. रुग्णालयाचा प्रशासकीय कारभार रुळावर आणण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी स्वत: लक्ष द्यावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.
दिग्रसचे ग्रामीण रुग्णालयच आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 11:34 PM
तालुक्यातील गोरगरिबांच्या आरोग्याची जबाबदारी वाहणारे येथील ग्रामीण रुग्णालयच स्वत: खस्ताहाल भोगत आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा अभाव असून साधे पिण्याचे पाणीही रुग्णालयात मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेनेच याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ठळक मुद्देडॉक्टरांचा अभाव : पाण्याची समस्या, एक्स-रे मशीन धूळ खात, परिसरात घाणीचे साम्राज्य