यवतमाळ : ट्रॅव्हल्स मालक व चालकांच्या बेदरकारपणामुळे निष्पाप प्रवाशांचा बळी जात आहे. समृद्धी महामार्गावर २५ जणांचा ट्रॅव्हल्स अपघातात नुकताच जळून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच ट्रॅव्हल्स चालक व मालक सुधारण्यास तयार नाही. पुणे येथून बुधवारी रात्री प्रवासी घेवून निघालेल्या ट्रॅव्हल्सचा चालक मद्यधुंद अवस्थेत सुसाट वाहन हाकत होता. हे पाहून त्यातील २५ प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. एका प्रवाशाने दारव्हा ठाणेदाराचा मोबाईल नंबर मिळवून त्यांना संपर्क केला. आपबिती सांगितली. त्यानंतर ही ट्रॅव्हल्स दारव्हा येथे गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता थांबविण्यात आली. तेव्हा प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
बुधवारी रात्री पुणे येथून २५ प्रवासी घेवून ही ट्रॅव्हल्स नागपूरकडे निघाली. काही अंतर पार केल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक बेदरकारपणे वाहन हाकत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. नुकतीच समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा येथील अपघाताची घटना घडली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाच्या मनात ट्रॅव्हल्सबाबत भीती निर्माण झाली आहे. त्यात चालक काही ऐक ऐकण्यास तयार नव्हता. या संकटातून सुटका कशी करायची अशी धडपड प्रवाशांची सुरू होती. या प्रवाशांनी दारव्हा ठाणेदार विलास कुलकर्णी यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना संपर्क केला.
ट्रॅव्हल्स चालकाच्या कृत्याची व जीव धोक्यात असल्याची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ शहरात बसस्थानकासमोर ही ट्रॅव्हल्स पोलिसांनी थांबविली. चालक अमृत प्रल्हाद थेर (४६) रा. माहुली ता. दारव्हा याला ताब्यात घेतले. तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्ताचे नमुनेही तपासणीला पाठविण्यात आले. ट्रॅव्हल्स मालक व चालक या दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दारव्हा पोलिस ठाण्यात सुरू होती. शिवाय या ट्रॅव्हल्सची सुद्धा आरटीओंकडून तपासणी केली जाणार आहे. ट्रॅव्हल्स मालकावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. त्यानंतर प्रवासी पर्यायी वाहनाने नागपूरकडे रवाना झाले आहे.
प्रवाशांच्या सतर्कतेने टळला अनर्थदिवसाचा प्रवास असल्याने मद्यधुंद चालकाचा प्रताप प्रवाशांच्या लक्षात आला. रात्री जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये मात्र प्रवाशी बिनधास्तपणे झोपी जातात. ट्रॅव्हल्स मालक कुठलीही पडताळणी न करता चालकांना ट्रॅव्हल्स सोपवितात. त्यात प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जातो. असे प्रकार सातत्याने घडत आहे. यवतमाळातील अपघातात १२ प्रवासी तर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतरही यात सुधारणा झालेली नाही. प्रशासन कुठलीच कारवाई करताना दिसत नाही. हप्तेखोरीतून ट्रॅव्हल्स मालकांनी यंत्रणेला दावणीला बांधल्याचा आरोप होत आहे.