डोंगरखर्डा (यवतमाळ) : जिल्ह्यातील खुनाचे सत्र थांबण्यास तयार नाही. नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सात खून झाले आहेत. कौटुंबिक वादातूनच या घटना घडत आहेत. कळंब तालुक्यातील खोरद येथे शेतात राखणीला गेलेल्या पतीने पत्नीचा खून केला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
शोभा मारोती झोरे (४२, रा. खोरद) असे मृत महिलेचे नाव आहे. पती मारोती झोरे याने गावातीलच शेती मक्त्याने घेतली होती. रात्री पिकांचे वन्यप्राणी नुकसान करतात. त्यामुळे दोघेही पती-पत्नी नेहमीच शेतात राखणीला जात होते. बुधवारी सायंकाळी दोघेही शेतात राखणीला गेले. लगतच्या गावात बाजार असल्याने मारोती दारू पिऊन आला. तेथे शेतातच पत्नी शोभासोबत मारोतीचा वाद झाला. या वादात त्याने दारूच्या नशेत पत्नीला पेटत्या लाकडाने मारहाण केली. नंतर वजनदार वस्तूने डोक्यावर प्रहार केला. यात शोभाचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पोलिस पाटलाने याची माहिती कळंब पोलिस ठाण्यात दिली. यावरून सहायक निरीक्षक चौथनकर यांनी घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी कुऱ्हाड, जळालेले लाकूड आढळून आले. शोभाच्या अंगावर ठिकठिकाणी चटके दिल्याच्या जखमा दिसत होत्या. पोलिसांनी आरोपी मारोती महादेव झोरे याला अटक केली. या दाम्पत्याला दोन मुुले असून ती १५ व १६ वर्षांची आहेत. मुले शिक्षणासाठी बाहेर आहेत. दोघे पती-पत्नी गावात राहून शेती करीत होते. या प्रकरणी शोभाची बहीण यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
नववर्षात जिल्ह्यात खुनाची मालिका
नवीन वर्षात जिल्ह्यात सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. यवतमाळ शहरात वाघापूर परिसरात दारूच्या नशेत नवऱ्याने पत्नीचा खून केला. त्यानंतर लाडखेड हद्दीत संशयातून पतीने पत्नीला शेतात संपविले. यापूर्वी बाभूळगाव तालुक्यात दाभा येथे सावत्र बापाने आठ वर्षांच्या चिमुकल्याला ठार केले. मालमत्तेच्या वादातून पुतण्याने काका व चुलत भावाची हत्या केली. अवैध व्यवसायातील वर्चस्वातून सात जणांनी दोन दिवसांपूर्वी यवतमाळातील कृषी महाविद्यालयाच्या शेतात युवकाचा खून केला. त्यानंतर कळंब तालुक्यातील ही घटना घडली आहे.