यवतमाळ : वर्धा, गडचिरोली व चंद्रपूरपाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातही सर्वत्र दारूबंदीची मागणी होत असतानाच शनिवारी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर या आपल्या गृहजिल्ह्यातील दारूबंदी फसल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर महिला, शाळकरी विद्यार्थ्यांना दारू तस्करीत ओढणा-या या दारूबंदीचा फेरविचार करावा, जप्त दारू नाश न करता त्याचा लिलाव करावा, त्यातून मिळणा-या रकमेतून पोलिसांचे खबरे व दारू पकडणाºया संंबंधित पोलिसांना बक्षीस द्यावे, अशी मागणीही ना. वडेट्टीवार यांनी केली. ३० टक्के दारू बनावट : पोलीस रिपोर्ट ना. वडेट्टीवार जिल्हा दौ-यावर आले असता सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अधिकृत दारूपेक्षाही चंद्रपूर जिल्ह्यात अनधिकृत दारूची विक्री वाढली आहे. पोलीस अधिका-यांच्या माहितीनुसार जप्त झालेल्या दारूपैकी ३० टक्के दारू ही बनावट आहे. दोन वर्षात पोलीस कारवाईत १८० कोटींची दारू जप्त झाली आहे. मात्र या दारूचा लिलाव होत नाही. त्यामुळे माफियांचे फावत आहे. जप्त झालेल्या दारूंचा लिलाव करून त्यातील २० टक्के रक्कम कारवाई करणाºया पोलीस अधिकारी व खबºयांना द्यावी, असा प्रस्ताव राज्य शासनापुढे ठेवणार आहोत. पर्यटनस्थळी दारूला परवानगी द्याचंद्रपूरमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांचे पसंतीचे स्थान आहे. मात्र हौसे खातर आलेला पर्यटक येथील रिसॉर्ट, हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबत नाही, तो नागपूरला जातो. त्यामुळे स्थानिक हॉटेल व रिसॉर्ट ओस पडले आहेत. पर्यटनाचा महसूलच घटला आहे. याबाबतही किमान पर्यटनस्थळी असलेल्या हॉटेल, रिसॉर्टमध्ये दारू विक्रीला परवानगी द्यावी. तर १७ हजार कोटींच्या महसुलावर पाणी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करून त्याचा उपयोग होत नाही, उलट दारू माफिया निर्माण झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करावी. असे करताना १७ हजार कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार हेही तितकेच धक्कादायक वास्तव आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करा. राज्यात दारूबंदी केल्यास येथील सीमा पूर्णपणे सील करता येणे शक्य आहे. एकाच जिल्ह्यात दारूबंदी केल्याने यंत्रणेवर प्रचंड ताण येतो. ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य नाही. त्यामुळे चंद्रपुरात चोरट्या मार्गाने प्रचंड दारू येत आहे. यासाठी शाळकरी मुले, महिला यांचा वापर होत आहे. हे दारू सुरू असण्यापेक्षाही बंदी असल्याचे घातक परिणाम आहे. याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव ठेवणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
चंद्रपुरातील दारूबंदी फसली; जप्त दारूचा लिलाव करा- विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 8:47 PM