शेतकऱ्यांचे अभिनव दिवाळी आंदोलन : नेर तहसीलच्या आवारात पेटविले २८८ दिवेनेर : दिवाळीसारखा महत्त्वाचा सण. पण शेतकऱ्यांच्या घरातील अंधार हटायला तयार नाही. तीन वर्षांपासून सतत दुष्काळ. शेतकऱ्यांच्या मनातील हा काळोख ऐन दिवाळीच्या दिवशी नेर तहसीलच्या प्रांगणात प्रकाश शोधत होता. अस्वस्थ शिवारातील हुंदक्यांनी आपल्या दारात दिवे लावण्याऐवजी तहसीलच्या दारात दिवे लाऊन अनोखे आंदोलन केले. ११ नोव्हेंबरला युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने ‘दिवाळी प्रशासनासोबत’ हे अनोखे आंदोलन करण्यात आले. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत करावी, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू करण्यात याव्या या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दुपारी २ वाजता सुरू झालेले आंदोलन अंधार पडेपर्यंत कायम होते. हिरव्या स्वप्नांचा चुराडा झालेली मने या दरम्यान सात्विक संतापाने खदखदत होती.विदर्भाच्या शेतकरी आंदोलनात मैलाचा दगड ठरू पाहणारे हे आंदोलन सामूहिक नेतृत्त्वात छेडण्यात आले. सारी फाटकी माणसे आपल्या वेदनांना न्याय मिळावा म्हणून तहसीलच्या प्रांगणात गोळा झाली होती. अंधार पडल्यानंतर शहरात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. पण हे शेतकरी आपल्या बैलजोडीसह तहसील प्रशासनाच्या दारात दिवे लावत होती. यावेळी २८८ दिवे लावण्यात आले. विधानसभेचे २८८ आमदार राज्याचे प्रतिनिधित्व करतात म्हणून हे २८८ दिवे आंदोलकांनी लावले. शेतीच्या प्रश्नावर आता तरी सर्व लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घ्यावी, हा संदेश या दिव्यांच्या माध्यमातून देण्यात आला. अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या मालिकांनी खचलेल्या शेतकऱ्यांच्या मनातील संताप या अभिनव आंदोलनात व्यक्त झाला. शासन व प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे आंदोलन ठरले. जिल्ह्यात या आंदोलनामुळे वेगळी ठिणगी पडणार आहे. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी महसूल प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. (तालुका प्रतिनिधी)
दुष्काळी दिव्यात निषेधाचे तेल
By admin | Published: November 13, 2015 2:15 AM