मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार : भूमिगत गटाराचे काम अद्यापही अर्धवटच वणी : शहरातील बजरंग ले-आऊट, फाले ले-आऊट व गेडाम ले-आऊटमधील नळाची पाईपलाईन फुटल्याने दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत शिवसेनेचे शहर प्रमुख बंडू चांदेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून शहरातील बजरंग ले-आऊट, फाले ले-आऊट व गेडाम ले-आऊटमध्ये भूमिगत गटाराचे काम चालू आहे. मात्र हे काम अद्यापही अर्धवट अवस्थेतच आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच जेसीबीद्वारे नालीचे खोदकाम करताना नळाची पाईपलाईन फुटली. त्यामुळे वॉर्डात दूषित पाणी पुरवठा केल्या जात आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याबाबत अनेकदा संबंधित अधिकारी व कंत्राटदाराकडे नागरिकांनी तक्रार केली. मात्र या समस्येकडे लक्ष देण्यात आले नाही. संबंधित कंत्राटदाराचे मजूर थातुरमातूर काम करून अर्धवटच ठेवतजात. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. या बांधकामासाठी लागणारे सिमेंटचे पाईप, रेती, गीट्टी व खोदलेली नालीची माती रस्त्यावरच पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. या चिखलामधून विद्यार्थी व नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. या मार्गाावर अंधारात एखादी दुर्घटनासुद्धा होण्याची भिती निवेदनातून व्यक्त करण्यात आलेली आहे. नगरपरिषदेने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन अर्धवट ठेवलेले काम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला द्याव्या, पिण्याच्या पाण्याची समस्या लवकरात लवकर निकाली काढावी, संबंधित कंत्राटदाराविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या समस्या निकाली न निघाल्यास नागरिकांसह शिवसेना आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही शहर प्रमुख बंडू चांदेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
नळाची पाईपलाईन फुटल्याने दूषित पाणीपुरवठा
By admin | Published: July 23, 2016 12:31 AM