लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊन-४ मध्ये प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये उघडली असली तरी तेथील कामकाज मात्र ठप्प होते. परंतु परिवहन आयुक्तांनी आता या कार्यालयांच्या कामकाजांचीही वर्गवारी केली आहे.रेड झोन व नॉन रेड झोनमधील कोणत्या कार्यालयात कोणती कामे होऊ शकतील या संबंधीचे आदेश परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी २६ मे रोजी जारी केले. त्यानुसार, रेड झोनमध्ये असलेल्या प्रादेशिक (आरटीओ) व उपप्रादेशिक (डेप्युटी आरटीओ) कार्यालयांमध्ये केवळ नवीन वाहनांची नोंदणी होऊ शकणार आहे. नॉन रेड झोनमधील कार्यालयांमध्ये नवीन वाहनांची नोंदणी, वाहन हस्तांतरण, कर्जाचा बोझा चढविणे-उतरविणे, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवाना विषयक कामे, परवाना नूतनीकरण, दुय्यमीकरण आणि अंमलबजावणी विषयक कामे होणार आहे. नॉन रेड झोनमध्ये वाहन चालकांना शिकावू आणि कायमस्वरूपी परवान्यासाठी (ड्रायव्हींग लायसन्स) मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची सक्तीआरटीओतील कामकाज चालविण्यासाठीही कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, कार्यालय पूर्णत: सॅनिटाईज करून घ्यावे, त्यासाठी पालिकेची मदत घ्यावी, खासगी संस्थेचीही मदत घेता येईल, हॅन्ड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावे, कर्मचाऱ्यांना नियमित हात सॅनिटाईज करण्याचे बंधन घालावे, मास्क व हातमोजे वापरावे आदी बंधने घालण्यात आली आहे.
वाहन निर्जंतुकीकरण मालकाकडूनवाहनांचा कर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावा, खटला विभागातील कामकाज व विभागीय कारवाईचा दंड ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावा, कर्मचारी संख्येनुसार कामकाजाचा कोटा निश्चित करावा, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे, एका व्यक्तीकडून एकच काम स्वीकारावे, कागदपत्रे कमीत कमी हाताळावी, ती सॅनिटाईज करून घ्यावी, कक्षामध्ये बाह्यव्यक्तीला उपस्थित राहू देऊ नये, योग्यता प्रमाणपत्र नूतणीकरण करण्यासाठी येणाऱ्या वाहनाचे निर्जंतुकीकरण वाहन मालकाच्या खर्चाने करून घ्यावे आदी निर्देश देण्यात आले आहे.