उमरखेड : तालुक्यातील बंदी भाग हा विविध समस्यांनी ग्रस्त आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अत्यंत खराब रस्त्यांमुळे हा परिसर मुख्य प्रवाहापासून तुटल्यासारखा उपरा झाला आहे.बंदी भागातील अनेक गावे दुर्गम आहेत. शैक्षणिकदृष्ट्या हा भाग मागास आहे. येथे वीज, पाणीपुरवठा अशा अनेक समस्यांनी ठाण मांडले आहे. त्यातच रस्तेच सुस्थितीत नसल्याने परिसरवासीयांची एकप्रकारे अडवणूकच केली जात आहे. बंदी भागातील रस्त्यांंना रस्ते म्हणावे की नाही, असा पेच पडतो. गेल्या कित्येक वर्षांपासून खड्ड्यातून नागरिकांना वाहन चालवावे लागत असल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. उमरखेड तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. मात्र रस्त्याच्या बांधकामात निकृष्ट साहित्य उपयोगात येत असल्याने बांधकामानंतर काही दिवसातच रस्ता उखडतो. त्यावरील खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र खड्डे कायमस्वरूपी बुजविले जात नाही. खास करून बंदी भागातील कुरळीसारख्या भागात तर रस्त्यांची मोठी समस्या आहे. खड्ड्यातून मार्गक्रमण करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. कधी काळी डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर आता डांबराचे अवशेषही शिल्लक दिसत नाही. गिट्टी उघडी पडली आहे. रस्त्यांची दुरुस्तीच होत नाही. परिणामी नागरिकांना या रस्त्यांचा मन:स्ताप सहन करावा लागतो. रस्तेच नसल्याने अनेक गावे शहराच्या संपर्कापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांचा विकासही खोळंबला आहे. (शहर प्रतिनिधी)
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे बंदी भागात उपरेपणाची भावना
By admin | Published: May 22, 2016 2:08 AM