आर्णी : चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या ४२ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील घोळ दिवसेंदिवस वाढतच आहे. नगरसेवकांमधील समन्वयाचा अभाव व विविध वादांमुळे या योजनेला ग्रहण लागले आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना आर्णीकर जनतेला हुलकावणी देण्याचीच शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्या नगरसेवकांनी आपल्या स्वार्थासाठी आर्णीकरांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा घाट घातला, अशांना येणाऱ्या निवडणुकीत पाणी पाजण्याच्या चर्चा चौकाचौकात सुरू आहे. योजनेचे श्रेय कुणाला जाणार, हे महत्त्वाचे नसून पाणीपुरवठा योजना सुरू होणे आवश्यक होते. आर्णीकरांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. नगरसेवकांमध्ये पडलेले दोन गट, त्यांच्या आपसी मतभेदातून व स्वार्थातून या योजनेला राजकीय ग्रहण लागले आहे. तत्कालिन मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आर्णी शहरासाठी ४२ कोटी ८० लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. अरुणावती धरणावरून पाणीपुरवठा करण्यात येणार होता. अस्तित्वात असलेल्या सोडून दोन नवीन पाण्याच्या टाक्या अनुक्रमे सहा लाख व चार लाख लिटर क्षमतेच्या होणार होत्या. महाळुंगी रोडवर अद्ययावत जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच अंतर्गत पाईप लाईनमध्ये सुधारणा अशी कामे या योजनेत होणार होती. परंतु सुरुवातीपासूनच पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे करायचे की खासगी कंपनीद्वारे यावर नगरसेवकांमध्ये मतभेद निर्माण झाले. सुरुवातीला यवतमाळचे खासगी कंत्राटदार यांना काम देण्यावर एकमत झाले असता राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रांजली खंदार यांनी जिल्हाधिकारी, आयुक्तांकडे अपील करून १६ नगरसेवकांच्या तोंडाला फेस आणला होता. यात नगरसेवकांचे चांगभले होणार असल्यामुळे एक विरुद्ध सर्व असा सामना सतत रंगत राहिला. आर्णीकरांना शुद्ध पाणी मिळणार की नाही, हा मुद्दा विसरून नगरसेवक स्वार्थातच गुंतले. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यात पुणे येथील ग्राफिक कंपनीला काम मिळाले, तर नागपूर येथील बी.आर. कंस्ल्टंट कंपनीची निविदा रद्द झाली. २७ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात मेहकर येथील आमदार रायमूलकर यांनी निधी प्रक्रियेवर आक्षेप घेतला. पीएमसी निविदा प्रक्रियेची चौकशी अंतिम टप्प्यात असून १२ डिसेंबर २०१३ पासून या योजनेची सुरुवात करण्यात आली, तेव्हापासून योजना वादातच अडकत आहे. नगरसेवक गणेश हिरोळे यांचा एक गट, तर नगराध्यक्ष आरिज बेग यांचा दुसरा गट पाणीपुरवठा योजनेच्या मुद्यावर आमनेसामने आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्यातच नगरसेवकांचा वेळ खर्च होत आहे. आर्णीकरांच्या जिव्हाळ्याची ही योजना असताना कोणाला काम मिळेल, या मुद्यावरच नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. नागरिकांना शुद्ध पाणी पुरविण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. मात्र तिच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे निर्माण करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)आगामी निवडणुकीत ‘पाणी’ गाजणारकाँग्रेसचे नगरसेवक गणेश हिरोळे यांनी पाणीपुरवठ्यासंबंधी व्यथा मांडल्या, तर शिवसेनेच्या नगरसेविका रेखा ढाले यांचे पती विजय ढाले हे ३ फेब्रुवारीपासून लोकप्रतिनिधींच्या विरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मौन धारण करून उपोषणाला बसले. ४ फेब्रुवारीला सकाळी नगराध्यक्ष आरिज बेग, प्रवीण मुनगिनवार, नारायण चेलपेलवार, विठ्ठल देशमुख, राजेंद्र शिवरामवार, छोटू देशमुख, रमेश ठाकरे यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता झाली. एक महिन्याच्या आत पाणीपुरवठ्याचा तिढा सोडविण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. पाणीपुरवठा योजना हा त्यांचा मुद्दा असून शहरातील विविध संघटनासुद्धा योजना पूर्णत्वास नेण्याच्या बाजूच्या आहेत. आर्णीचा पाणीप्रश्न आता पेटला असून राजकारण बाजूला ठेवून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिक करीत आहे. येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पाणीपुरवठा योजनेतील घोळाचे परिणाम राजकीय पुढाऱ्यांना नक्कीच दिसतील, असे बोलले जात आहे.
पाणीपुरवठा योजनेचे गौडबंगाल संपता संपेना
By admin | Published: February 06, 2016 2:43 AM