शिंदोला : राज्यातील राजकीय पक्षांना सरकार स्थापनेच्या चिंतेने ग्रासले असताना दुसरीकडे मात्र जगाचा पोशिंदा यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे चिंतीत झाला आहे़ भविष्यात शेती कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे़यंदा वणी उपविभागात बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर अल्प पाऊस पडला़ त्यामुळे ‘न भूतो न भविष्यती’ असा दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ संपूर्ण शेती हंगाम हातचा गेला आहे़ सोयाबिनच्या पिकाने पूर्णत: दगा दिला़ सोयाबिनच्या मशागतीला लागलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. ज्या ठिकाणी एका बॅगला १० ते १२ क्विंटल सोयाबीन व्हायचे, त्या ठिकाणी यावर्षी दोन, तीन क्विंटल सोयाबीन होत आहे. जवळपास कापसाचीही तीच गत आहे़ शेतीच्या मशागतीसाठी केलेला खर्च निघणेही यावर्षी कठीण झाले आहे़ त्यामुळे सालदार व मजुरांचे पैसे कोठून द्यावे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे़ अपुऱ्या पावसाअभावी जमिनीत ओलावा नाही़ त्यामुळे रबी हंगामही धोक्यात सापडला आहे़ आॅक्टोबर महिन्यात एखादा पाऊस झाला असता, तर कपाशीसह रबी पिकांना लाभ झाला असता़ मात्र परतीच्या पावसासह समुद्री वादळानेही हुलकावणी दिली़ त्यामुळे रबी हंगामाची मशागत व्यर्थ जाण्याची शक्यता बळावली आहे. जमिनीत ओलावाच नसल्याने तुरीचे पिकही यावर्षी नाममात्र होण्याची शक्यता आहे़ जलसिंचनाखालील पिके भारनियमनामुळे धोक्यात आली आहेत. दुष्काळी परिस्थितीचा सामना कसा करवा, असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला असताना लोकप्रतिनिधी मात्र राजकीय चर्चेत गुंतलेले आहे़ तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना तालुका प्रशासनाने पीक आणेवारी ५० टक्क्यांच्या वर दर्शविली. या दुष्काळी परिस्थितीचा श्रीमंत शेतकरी कसा तरी सामना करू शकेल, मात्र गरीब, अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ इच्छा असूनही शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाही़ त्यामुळे पुढील शेती हंगामासह शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडून त्यांचे भवितव्यच धोक्यात आले. (वार्ताहर)
दुष्काळामुळे बळीराजा संकटात
By admin | Published: October 30, 2014 10:59 PM