सुलतानी संकट : महसूल राज्यमंत्री घेणार बैठक, सोमवारपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता यवतमाळ : नेहमीच आसमानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या बंदने सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमाल खुल्या बाजारात गेल्याने खासगी व्यापाऱ्यांना लुटीची संधी मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समितीचे व्यवहार ठप्प पडले. आधीच शेतमालास न मिळणाऱ्या योग्य दरामुळे शेतकरी संकटात आहेत. अशात व्यापाऱ्यांच्या वादाने बाजार समितीची उलाढाल बंद पडली आहे. गेल्या १२ दिवसांपासून जिल्हा मुख्यालयाच्या येथील बाजार समितीत सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांपुढील शुक्लकाष्ट संपता संपेनासे झाले आहे. मात्र कोणत्याही लोकप्रतिनीधींनी अद्याप शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. बाजार समितीचे व्यवहार ठप्प पडल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. शेतकरी संकटात आहे. त्यांच्या हाती पैसा नाही. त्यांच्या घरातील सर्व कार्ये रखडली आहे. यामुळे त्रस्त शेतकरी खुल्या बाजारात आपला शेतमाल विक्रीस नेत आहे. जवळ एकही पैसा नसल्याने नाईलाजाने त्यांना खुल्या बाजारात आपला शेतमाल मातीमोल भावात विकावा लागत आहे. शेतकऱ्याची ही नड ओळखून व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात शेतकऱ्यांना लुुटण्याची मोहिमच हाती घेतली आहे. वाट्टेल त्या दरात व्यापारी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करीत आहे. संपूर्ण यंत्रणा हा तमाशा उघड्या डोळयांनी बघत आहे. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी कुणालाही सवड नाही. यातून व्यापारी अल्पावधीतच गडगंज होत आहे. लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून सर्व प्रकार बघत आहे. त्यांना शेतकऱ्यांशी कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. बाजार समितीने व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. (शहर वार्ताहर) व्यापारी म्हणतात ईलेक्ट्रॉनिक काटेच हवे बाजार समितीतून बारदाना चोरीला जातो आणि माल कमी भरतो. हा प्रकार काही ओट्यांवर होतो. यामुळे व्यापाऱ्यांनी शेतमालाच्या मोजमापासाठी स्वत:च्या मालकीचे ईलेक्ट्रॉनिक काटे लावण्याची मागणी बाजार समितीकडे केली आहे. मात्र समितीने जसे आहे, त्याच परिस्थितीत मोजमाप प्रक्रिया राबविण्याची सूचना केल्याचे सभापती रवींद्र ढोक यांनी सांगितले. तूर खरेदी केंद्रांचे हाल कायमच जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू कमी अन् बंदच जादा काळ राहिले आहे. हे केंद्र सुरू असण्यापेक्षा त्याचा बंदचा काळच जादा आहे. यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. कधी बारदाना नाही, तर कधी तूर ठेवण्यासाठी जागा नाही. शेतकऱ्यांचे हाल अजूनही कायम आहेत. यानंतरही याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना उपाययोजना करण्यास वेळ नाही. शासन आणि प्रशासन दोन्ही कोडगे झाल्याने शेतकरी संतप्त आहे. आता केवळ सात दिवस हे केंद्र उघडे राहणार आहे. १५ एप्रिलपासून ते बंद होणार आहे. या सात दिवसांत खरच उर्वरित तूर खेरीद केली जाईल काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
व्यापाऱ्यांमुळे बाजार समितीत शेतकऱ्यांची कोंडी
By admin | Published: April 08, 2017 12:18 AM