किशोर वंजारी
यवतमाळ : शिकायचे आहे, पण प्रवासाचे साधन नाही. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना चक्क ऑटोरिक्षाच्या टपावर बसून शाळेत जावे लागत आहे. एसटी बसेस बंद असल्याने हे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. या प्रकारे प्रवास करताना अपघाताची मोठी घटना घडण्याची भीती आहे. कारखेडा येथील एक १४ वर्षीय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. जीवावर उदार होऊन या विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास सुरू आहे.
एसटीच्या बंदचा सर्वाधिक फटका सध्या विद्यार्थ्यांना बसत आहे. आडमार्गावर असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. या वाहनांमध्ये खचाखच प्रवाशी भरले जातात. जागा शिल्लक असेल, तरच त्यांना बसायला मिळते. कधी लोंबकळून प्रवास करावा लागतो. या ठिकाणीही जागा मिळाली नाही, तर टपावर बसून शाळेत जावे लागते.
कारखेडा येथील सर्वात जास्त विद्यार्थी लोही येथे शिकतात. कोव्हळा पुनर्वसन, शिरजगाव, मांगलादेवी माणिकवाडा येथे ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. बसेस नसल्याने या विद्यार्थ्यांना ऑटोरिक्षाशिवाय पर्याय नाही. टपावर बसून प्रवास करण्यासोबतच तिकीटही अव्वाच्या सव्वा घेतले जाते. पोलीस विभाग हा सर्व प्रकार का सहन करत आहे, हे न उलगडणारे कोडे आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता कारखेडा येथून लोही जाणाऱ्या ऑटोतून पडून एक विद्यार्थी जखमी झाला. टपावरील ही जीवघेणी वाहतूक थांबवावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.