यवतमाळ : भरधाव ट्रकने चिरडल्याने ट्रॅफिक पोलिसाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ येथे घडली आहे. यवतमाळमधील कळंब बायपासवर मंगळवारी ( 3 एप्रिल) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बाईकनं ट्रकचा पाठलाग करत असताना सय्यद करीमोद्दीन (वय 50 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे.
करीमोद्दीन हे यवतमाळच्या जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत होते. मंगळवारी सकाळी कळंब बायपासवर कर्तव्य बजावत असताना एक ट्रक हात दाखवूनही थांबला नाही. त्यामुळे सय्यद करीमोद्दीनने आपल्या बाईकने त्याचा पाठलाग केला. बाईक ट्रकच्या पुढे काढण्याच्या प्रयत्नात ते ट्रकच्या चाकाखाली आले. डोक्यावरूनच ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.