लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत वादळी-वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी संपूर्ण जिल्ह्यातच वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. हातात आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याचे बघून शेतकरी हतबल झाले. जिल्ह्यात गुरुवारपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. गुरुवारी यवतमाळसह पुसद, महागाव, वणी, मारेगाव, दारव्हा आदी तालुक्यांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यानंतर शुक्रवारीसुद्धा जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी पाऊस कोसळला. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जिल्ह्यात सर्वत्र वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. मारेगाव, पुसद, महागाव, कळंब, आर्णी, दारव्हा, पांढरकवडा, वणी, राळेगाव आदी तालुक्यांत वादळी पावसाने होत्याचे नव्हते केले. अवकाळी पावसामुळे शेतात गंजी लावून ठेवलेले गहू आणि हरभऱ्याचे पीक ओले झाले. शेतात उभा असलेला गहू आणि हरभरा पिकालाही फटका बसला. काही तालुक्यांत वादळामुळे गहू आडवा झाला. हरभऱ्याच्या घाट्या फुटून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. संत्रा, पपई, केळी व आंबा पिकांनाही वादळ व अवकाळी पावसाचा फटका बसला. अनेक झाडांवरील कैऱ्या गळून पडल्या. केळी व पपईची झाडेसुद्धा मोडली. संत्रा पिकाचेही नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले. यावर्षी सुरुवातीपासूनच बळीराजावर संकटाची मालिका सुरू आहे. त्यातून सावरत असताना आता पुन्हा वादळासह पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी हतबल झाले आहे. दारव्हा तालुक्यात शनिवारी कोसळलेल्या पावसाने खोपडी शिवारातील शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. या परिसरात शेतकरी दत्तात्रय राहणे यांनी मोठा खर्च करून केसर आंब्याची लागवड केली आहे. काही फळे यापूर्वी पोपटांनी फस्त केली. आता त्यांनी झाडाला फिशनेटचे संरक्षण दिले. मात्र, वादळामुळे त्यांच्या शेतातील केसर आंब्याची वृक्ष मोडून पडली. झाडावरील कैऱ्याही गळाल्या. महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाही वादळ आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला. तालुक्यातील गहू, मका, उन्हाळी ज्वारी, हरभरा, केळी, पपई व भाजीपाल्याला फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हतबल झाले. वीट कारखानदारांनाही पावसाचा फटका बसला. खरिपानंतर रबी हंगामातील पीक हातून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले.
सावंगी पेरका येथे सहा जनावरे ठार राळेगाव : तालुक्याला शनिवारी वादळाने चांगलाच तडाखा दिला. यामुळे अनेक खांबांवरील वीज तार तुटले. सावंगी पेरका येथे रविवारी सकाळी याच वीज तारांचा स्पर्श झाल्याने सहा जनावरे जागीच ठार झाली. शेतकरी अशोक महाजन यांच्या मालकीची ही जनावरे होती. त्यांनी याबाबत तहसीलदार व पोलीस ठाण्याला माहिती दिली. तसेच त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
संपूर्ण जिल्ह्यात वीज गुल, ग्रामीण भाग अंधारातच शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळामुळे यवतमाळसह अनेक तालुक्यांतील वीज तारा तुटल्या. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. यवतमाळ शहरातही वीज गुल झाली होती. काही तालुक्यांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागली. रविवार सुटीचा दिवस असल्याने नेमक्या हानीची माहिती मिळू शकली नाही. प्रशासनासोबत संपर्क साधला असता कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.