ढाणकी : गेल्या अनेक वर्षांपासून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुठल्याही आरोग्य विषयक सुविधा नाही. त्यामुळे बुधवारी वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून निषेध नोंदविला.
सध्या सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया आदी आजारांनी जनता त्रस्त आहे. परंतु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत प्राथमिक आरोग्य केंद्रावर डफली बजाओ मोर्चा काढला. आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. आंदोलनाची दखल घेत एमबीबीएस दर्जाचे वैद्यकीय अधिकारी तात्काळ रुजू होणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद जाधव यांच्याकडून लेखी आश्वासन देण्यात आले.
लवकरच प्रसूतिगृह सुरू होऊन कुटुंब नियोजनाचे शिबिरही सुरू होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात आरोग्य विभागाकडून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा भरणा लवकर होईल, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले. दरम्यान, आंदोलकांनी आरोग्य केंद्रात सुविधा, औषधी साठा, प्रसुती गृह, कुटुंब नियोजन शिबिर, या समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी लावून धरली होती. मागण्या मान्य न झाल्यास येत्या काही दिवसात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
आंदोलनात जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे, नगरसेवक संबोधी गायकवाड, नगरसेविका बशनूर बी सय्यद खलील, संतोष जोगदंडे, सीमा गायकवाड, गोंटू राऊत, गोलू मुनेश्वर, सुमित कदम, पप्पू गायकवाड, श्याम राऊत, धम्मपाल गायकवाड, अमोल पाटील, विजय गायकवाड, अजय कदम, लड्डा घुगरे, संतोष कुलदीपके, स्वप्निल मुने व कार्यकर्ते सहभागी होते.
220921\1729-img-20210922-wa0036.jpg
वंचित बहुजन आघाडीचा प्राथमिक आरोग्य केंद्रावर डफली मोर्चा,*
(आक्रमक आंदोलकांना केले पोलिसांनी स्थानबद्ध, वैद्यकीय अधिकारी तात्काळ होणार रुजू)