‘मजीप्रा’चा अर्ज मोफत : १५०० रुपयांची घसघशीत बचत, फक्त सुरक्षा रक्कम घेतली जाणार यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नळजोडणीसाठीचे शुल्क मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. त्यामुळे अतिशय सामान्य कुटुंबही घरी नळ घेऊ शकणार आहेत. शिवाय अर्जही मोफत मिळणार आहे. तब्बल एक हजार ५०० रुपयांची बचत प्राधिकरणाच्या नवीन योजनेमुळे होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राज्यात २५ योजना राबविल्या जातात. यात अमरावती महापालिकेसह विविध नगरपरिषदांचा समावेश आहे. शिवाय ३५ प्रादेशिक योजना आहे. या योजनांवरून पाणीपुरवठा घेण्यासाठीच्या शुल्कात प्रचंड कपात करण्यात आली आहे. घरगुती नळजोडणीसाठी पाईप लाईनचे विविध प्रकार असले तरी सामान्यपणे १५ मीमीची पाईप लाईन वापरली जाते. यासाठी पूर्वी जवळपास २ हजार ६५० रुपयांवर खर्च लागत होता. आता या आकाराच्या पाईपलाईनसाठी केवळ ६५० रुपये भरावे लागणार आहे. यात सुरक्षा अनामत रक्कम ५०० रुपये तर नळजोडणी शुल्क १५० रुपये याबाबीचा समावेश आहे. शिवाय इतर आकाराच्या पाईल लाईनसाठीही शुल्क कमी करण्यात आले आहे. नळजोडणीसाठी प्राधिकरणाकडूनच मोफत अर्ज पुरविले जात आहे. पूर्वी अर्जासाठी १०० रुपये मोजावे लागत होते. शिवाय १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर जोडावा लागत होता. या २०० रुपयांच्या बचतीसोबतच तपासणी शुल्क, फेरुल खर्चाचा भार कमी झाला आहे. पूर्वी घरगुती नळजोडणीसाठी सुरक्षा अनामत रकमेसह २ हजार ६५० रुपयांपर्यंत खर्च येत होता. शिवाय बिगर घरगुती नळ, शाळा-कॉलेज, धर्मदाय संस्था आदींना ना नफा ना तोटा या तत्त्वावर जोडणी दिली जाते. मात्र सुरक्षा अनामत रक्कम घेतली जात होती आता केवळ १ हजार १०० रुपये सुरक्षा अनामत रक्कम आणि नळजोडणीचे शुल्क १५० रुपये असे एक हजार २५० रुपये भरून नळ घेता येणार आहे. सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसह परिपूर्ण अर्ज सादर केल्यानंतर केवळ ३० दिवसात जोडणी दिली जाणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची माहिती अर्जदारांना संपर्क करून कळविली जाणार आहे. (वार्ताहर)
नळजोडणी आता केवळ ६५० रुपयात
By admin | Published: February 08, 2016 2:29 AM