यवतमाळ : रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक सुरक्षा साधनांचा विचार केला जातो. यात प्रामुख्याने वाहनांवर रिफ्लेक्टर बसविणे सक्तीचे आहे. त्यासाठी नामांकित एजंसीज परिवहन विभागाने नेमल्या आहेत. रिफ्लेक्टरचा दर्जा राखला जावा म्हणून क्युआर कोड देण्यात आले आहे. तशी नोंद महावाहन या एमएस प्रणालीवर आरटीओ अधिकाऱ्यांना करणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून थेट डुप्लीकेट रिफ्लेक्टर लावून वरची रक्कम खिशात घातली जात आहे. रिफ्लेक्टरची गुणवत्ता नसल्यास अपघात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा गंभीर प्रकार संपूर्ण राज्यातच सुरू आहे.
रस्त्यावर वाहन चालविताना त्याच्या मागील-पुढील व दोन्ही बाजूंनी रिफ्लेक्टर टेप लावलेला असणे आवश्यक आहे. जेणे करून रात्रीच्या वेळेस वाहन समोर असल्याचे स्पष्ट दिसून येईल हा या मागचा उद्देश आहे. बरेचदा बिघाड झालेले वाहन रस्त्यावर उभे असते, त्यावर रिफ्लेक्टर नसल्यास दुसरे वाहन आदळून अपघात होतो. अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी १३ मे २०२२ रोजी परिपत्रकाच्या माध्यमातून राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सीमा तपासणी नाके यांना ब्रॅन्ड इगल्स बिझनेस सोल्यूशन यांचेच रिफ्लेक्टर कीट वापरण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे तर याची नोंद क्युआर कोड स्कॅन करून महावाहनवर भरणे आवश्यक आहे.
सुरुवातीचे काही दिवस या कीटचा वापर आरटीओच्या ट्रॅकवर वाहन तपासणी दरम्यान झाला. नंतर मात्र दलालांनी डुप्लीकेट रिफ्लेक्टर कीट वापरणे सुरू केले आहे. शासनाने प्राधिकृत केलेली रिफ्लेक्टर कीट २५०० रुपयांची होते. यातून शासनालाही महसूल मिळतो. मात्र डुप्लीकेट रिफ्लेक्टर कीट ७०० रुपयात उपलब्ध असून उर्वरित पैसे दलाल व संबंधित मोटर वाहन निरीक्षकाच्या खिशात जातात. या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडाला असून दुय्यम दर्जाचे रिफ्लेक्टर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे.
या संदर्भात शासन निर्देशित ब्रॅन्ड इगल्स बिझनेस सोल्यूशन या पुरवठादार एजंसीजने पोलिसात तक्रार केली आहे. ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. डुप्लीकेट प्रमाणपत्र व डोमेनेमचा वापर रिफ्लेक्टर कीटबाबत होत असल्याचे सांगितले. डुप्लीकेट रिफ्लेक्टर लावलेली वाहने पासिंग होत असल्याचाही आरोप कंपनीचे प्राे.प्रा. हितेश देसाई यांनी तक्रारीतून केला आहे.कोट
केंद्र सरकारने आयएसआय मार्क असणारे रिफ्लेक्टर टेप वापरण्याचे निर्देश दिले आहे. विशिष्ट कंपनीचे डुप्लीकेट प्रोडक्ट बाजारात आले असेल तर त्यावर कारवाई ही कंपनीची जबाबदारी आहे. आरटीओ अधिकारी त्यातील तज्ज नाही. वाहन पासिंग करताना रिफ्लेक्टर कीटचे बिल तपासले जाते. अपघात टाळण्यासाठी वाहनावर रिफ्लेक्टर आवश्यक आहे.
- दीपक गोपाळे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ