वितरणचा निर्णय : प्रत्येक मंडळाला स्वतंत्र मीटरयवतमाळ : देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या दुर्गोत्सवात वीज पुरवठ्याचा अडसर येऊ नये म्हणून दुर्गोत्सवाच्या काळात अखंंड वीज पुरवठा करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला आहे. संपूर्ण जिल्हा दुर्गोत्सव काळात भारनियमनमुक्त राहणार आहे. यामुळे मंडळाच्या रोषणाई आणि देखाव्यांमध्ये निर्माण होणारी मोठी अडचण दूर होणार आहे. यासोबतच प्रत्येक मंडळाला स्वतंत्र मीटर दिले जाणार असून त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यातच नव्हे तर देशात नावाजलेला आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणूनही ओळख आहे. अशा या दुर्गोत्सवात मोठ्या प्रमाणात देखावे आणि रोषणाई केली जाते. या काळात भारनियमनामुळे मंडळांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. सायंकाळच्या वेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने देखाव्यांचा आनंद शहरवासीयांंना लुटता येत नव्हता. रोषणाईवर लाखो रुपये खर्च करुनही त्याचा उपयोग होत नव्हता. यामुळे भक्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र यंदा दुर्गोत्सवात देवीभक्तांचा उत्साह द्विगुणित करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुर्गोत्सवाच्या काळात कुठेही भारनियमन केले जाणार नाही. अखंंड वीज पुरवठा करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला आहे. तसेच प्रत्येक मंडळाला तात्पुरती वीज जोडणी दिली जाणार आहे. मागेल त्याला तत्काळ वीज जोडणी मिळणार असून विजेचा दरही अल्प राहणार आहे. त्यामुळे मंडळाला आता तारांवरून आकोडे टाकून वीज पुरवठा घेण्याची कसरतही करावी लागणार नाही. (शहर वार्ताहर)चार मेगावॅट अतिरिक्त वीज लागणारदुर्गोत्सवाच्या काळात संपूर्ण शहरावर रोषणाई केली जाते. विविध मंडळे चलचित्र देखावे सादर करतात. त्यालाही मोठ्या प्रमाणात वीज लागते. दुर्गोत्सवाच्या काळात यवतमाळ शहराला चार मेगावॅट अतिरिक्त वीज लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे. यंदा काही मंडळांनी एलईडी लाईट वापरुन वीज बचत करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात दुर्गोत्सव भारनियमनमुक्त
By admin | Published: September 19, 2016 1:01 AM