पांढरकवडा (यवतमाळ) : तालुक्यातील सायखेडा (धरण) येथे एका जुन्या घराचे बांधकाम करताना धातूच्या ब्रिटिशकालीन मुद्रा असलेला हंडा सापडला. यांची संख्या ६३३ एवढी आहे. महसूल प्रशासनाने हा हंडा ताब्यात घेतला असून, यासंदर्भात शासनाला कळविण्यात आले आहे. या हंड्याचे काय करायचे, याबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
सायखेडा (धरण) येथील सुरेंद्र जयस्वाल यांचे घर जुने झाल्याने ते पाडण्याचे कंत्राट पांढरकवडा येथील मन्सूरअली जिवानी यांना देण्यात आला होता. घर पाडताना खोदकाम करतेवेळी जमिनीत अचानक एक धातूचा हंडा दिसून आला. हंडा उघडून बघितला असता, त्यात पांढऱ्या रंगाच्या ब्रिटिशकालीन मुद्रा आढळून आल्या. त्याची मोजणी केली असता, मुद्रांची संख्या ६३३ एवढी होती. यासंदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तो हंडा ताब्यात घेतला. त्यानंतर याबाबत महसूल विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर तो हंडा प्रभारी तहसीलदार रामदास बिजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
रामदास बिजे यांनी यांनी गुरुवारी हंड्यातील ब्रिटिशकालीन मुद्रांची मोजणी करून तो सीलबंद केला. या मुद्रांवर तत्कालिन राजाचे चित्र व इसवीसन लिहिले आहे. जयस्वाल यांच्या घराच्या बांधकामात सोन्याचा हंडा सापडल्याची चर्चा सर्वत्र हाेती. मात्र, त्या हंड्यात ब्रिटिशकालीन मुद्रा आढळून आल्याचे स्पष्ट होताच या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
सापडलेल्या मुद्रा ट्रेझरीत ठेवण्याची प्रक्रिया सुरू असून, याबाबत शासनाला कळविण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार त्या मुद्रांचे काय करायचे हे ठरविल्या जाईल.
रामदास बिजे, प्रभारी तहसीलदार, पांढरकवडा.