लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पालिकेच्या नवनियुक्त मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी मंगळवारी पहाटेच शहरातील सफाई कामांचा आढावा घेवून आपल्या कार्यपद्धतीची झलक दाखविली. मुख्याधिकाऱ्यांच्या सायकल दौऱ्यावेळी २८६ पैकी तब्बल १०० सफाई कामगार कामावर हजर नसल्याचे आढळून आले. या बाबत संबंधित कंत्राटदार अधिकाऱ्यांना तंबी देतानाच गैरहजर कामगारांची अनुपस्थिती लावण्याचे निर्देशही मुख्याधिकाऱ्यांनी दिले. पहाटेच झालेल्या लेटलतिफ कर्मचाऱ्यांवरील कारवाईमुळे सफाई मजुरांसह अधिकारी, नगरसेवकांचेही धाबे दणाणले आहेत. मुख्याधिकारी मडावी यांनी मंगळवारी पहाटे ४.३० च्या सुमारास सायकलवरून शहराच्या पाहणीस सुरुवात केली. आठवडी बाजार, दत्त चौक परिसरात पाहणी करीत सकाळी ६ च्या सुमारास त्यांनी नगरपालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांची स्वत: हजेरी घेतली. पालिकेत १८५ नियमित आणि कंत्राटदाराचे मिळून २८६ सफाई कामगार आहेत. मात्र सकाळी ६ च्या हजेरीला तब्बल १०० जणांची गैरहजेरी होती. हा प्रकार पाहिल्यानंतर संतापलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनाही खडेबोल सुनावले. गैरहजर असलेल्या सर्व १०० मजुरांची अनुपस्थिती लावा असेही त्यांनी या अधिकाऱ्यांना बजावले. वार्डातील रस्त्यांसह शहरातील मुख्य रस्त्यांची नियमित साफसफाई होते का याचाही मडावी यांनी यावेळी आढावा घेतला. सदर रस्त्यांच्या साफसफाईचे मध्यरात्री फोटो काढा तसेच भाजी मंडई येथील सफाईचे फोटो पहाटे ४ वाजता काढण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. मुख्याधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे नगरपरिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली.
मुख्याधिकाऱ्यांच्या सायकल फेरीचा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला धसका - मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्या बदलीनंतर पालिकेचा कारभार प्रभारीवर होता. आता पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले आहेत. माधुरी मडावी यांची यापूर्वीच्या ठिकाणांची कारकीर्द लक्षवेधी राहिलेली आहे. त्यामुळेच यवतमाळ पालिकेच्या ढासळलेल्या कारभाराला त्या वठणीवर आणतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळेच मंगळवारी मुख्याधिकारी मडावी यांच्या सायकल सफरीचा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धसका घेतला असला तरी शहरवासीयांनी मात्र या कार्यवाहीचे स्वागत केले आहे.
मुख्याधिकाऱ्यांमुळे फुटले कर्मचाऱ्यांचे बिंग - यवतमाळ शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शहराला अत्यावश्यक सुविधा पुरविण्याचे पालिकेपुढे आव्हान आहे. शहर स्वच्छतेसाठी नगरपरिषदेकडून कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो. मात्र त्यानंतरही मोठ्या प्रमाणात तक्रारी सुरूच असतात. - मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी मंगळवारी पाहणी केली असता सुमारे शंभर सफाई कामगार कामावर हजर नसल्याचे पुढे आले. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असावा, मात्र कामगार कामावर येतात की नाही, स्वच्छता होते की नाही याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले, ना पदाधिकाऱ्यांनी.
दररोज शहराच्या विविध भागांची सायकलवरून पाहणी करण्याची माझी सवय आहे. त्यानुसार मंगळवारी पहाटेपासूनच दत्त चौक, भाजी मंडईसह प्रमुख चौकात सफाई कामांची पाहणी केली. गैरहजर आढळलेल्या सफाई कामगारांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. माझा सायकलवरील शहराची रपेट यापुढेही सुरूच राहणार आहे. गैरहजर आढळणाऱ्या तसेच कामात कुचराई करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. - माधुरी मडावी, मुख्याधिकारी, नगरपरिषद यवतमाळ