पार्डी-निंबी : विवाह सोहळा म्हटले की आहेर आलाच. दोन्हीकडील मंडळींना नातेवाईक आहेर देतात; मात्र पुसद येथे प्रथमच पर्यावरणपूरक विवाह झाला. त्यात पारंपरिक आहेरांना फाटा देऊन केवळ रोपट्यांची मागणी करण्यात आली. पुणे येथील शिवप्रभा ट्रस्टचे कोषाध्यक्ष परशराम नरवाडे यांनी सामाजिक व पर्यावरणाविषयी कार्य करणाऱ्यांना बळ दिले. परिणामी, त्यांच्या मुलाच्या लग्नात जवळपास दीडशे झाडे, रोपट्यांचा आहेर आला.
संगीता व परशराम नरवाडे या दाम्पत्याचा मुलगा सोहम आणि उमररखेड तालुक्यातील बारा येथील वंदना व जनार्दन काळे यांची कन्या शिवानी काळे यांचा विवाह मंगळवारी पुसद येथे मोठ्या उत्साहात पार पडला. लग्न म्हटले की लग्नपत्रिका, मंगल कार्यालय, डीजे, फटाके हा वायफळ खर्च आलाच. सोबतच नातेवाईक आहेर आणतात; मात्र नरवाडे आणि काळे परिवाराने सामाजिक बांधीलकी जोपासत परंपरांना फाटा दिला. त्यांनी केवळ रोपट्यांचा आहेरच स्वीकारला जाईल, अशी भूमिका घेतली.
नातेवाईक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत संघटनांना आहेर न आणता, दहा ते १५ फुटांचे रोपटे, झाड व त्याच्या संगोपनासाठी लागणारा खर्च, असे एकूण एक हजार रुपये देण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला नातेवाईक आणि संघटनांनीही उत्स्फूर्त साद दिली. त्यामुळे हा आगळावेगळा विवाह चर्चेचा विषय ठरला.
मांडवात सगळीकडे हिरवाईच
नरवाडे आणि काळे कुटुंबीयांनी पारंपरिक बाबींना फाटा दिला. आहेर न स्वीकारण्याचा सर्वांना निरोप दिला. त्यामुळे नातेवाईकही क्षण अचंबित झाले; मात्र लग्न म्हटले की आहेर न्यावाच लागतो. आता आहेर काय न्यावा, असा प्रश्न सर्वांना पडला होता. तथापि, नरवाडे आणि काळे कुटुंबानेच त्यावर पर्याय दिला होता. त्यामुळे लग्नाला येणारी मंडळी हातात रोपटे आणि झाड घेऊन येत होती. त्यामुळे मांडवात सर्वत्र हिरवाई दिसत होती. या लग्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.