अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाविद्यालयात न जाताही पदव्या मिळविण्याचा मार्ग देशभरातील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठामुळे उपलब्ध आहे. मात्र महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणही शाळेत न जाता पूर्ण करता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना केली असून चालू शैक्षणिक सत्रात त्याची अमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अमरावती विभागात तब्बल ५६ संपर्क केंद्रही उघडली जाणार आहेत.गरिबी, आजारपण किंवा इतर विविध कारणांनी अनेकांचे शालेय शिक्षण अर्धवट राहते. तर काही विशिष्ट आजारग्रस्त विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी मुक्त विद्यालय मंडळाच्या निमित्ताने सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. राज्य शिक्षण मंडळाशीच हे मंडळ संलग्न असल्याने अभ्यासक्रमात फारसा फरक राहणार नाही. घरीच अभ्यास करून मुक्त विद्यालय मंडळाची परीक्षा देऊन वंचितांना आपले पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे.परंतु, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यालय मंडळाची परीक्षा देताना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. शैक्षणिक साहित्यही मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय मंडळाने यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम या पाचही जिल्ह्यात मुक्त विद्यालय मंडळाचे संपर्क केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबवित असलेल्या शाळांमध्येच हे केंद्र उघडले जाणार आहे.प्रत्येक तालुक्यात किमान एक संपर्क केंद्र दिले जाणार आहे. त्यानुसार अमरावतीत १४, यवतमाळात १६, बुलडाण्यात १३, अकोला ७ आणि वाशीम जिल्ह्यात ६ संपर्क केंद्र मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, एका केंद्रावर ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यास त्या तालुक्यात दोन संपर्क केंद्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची मुक्त विद्यालय मंडळात नोंदणी करून घेणे, गरजेनुसार त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांचे परीक्षा अर्ज भरून घेणे, त्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र देणे आदी कामे या संपर्क केंद्रात होणार आहेत. शिवाय, दर शनिवारी आणि रविवारी येथे प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील अडचणीही सोडवून घेता येणार आहे.प्रौढांनाही संधीअनेकांच्या नशिबी दोन वेळच्या जेवणासाठी बालपणापासूनच मजुरी येते. पोटासाठी शाळा सुटते. वय वाढल्यावर गुणवत्ता असूनही शिकता येत नाही. शाळेत जाऊन बसावे तर ‘लोक काय म्हणतील’ हा न्यूनगंडही सतावतो. अशा प्रौढ विद्यार्थ्यांना मुक्त विद्यालयामुळे शाळेत न जाताही अगदी पहिलीपासून बारावीपर्यंत शिक्षण घेणे शक्य होणार आहे. तर शहरांमध्ये वाढत असलेल्या ‘होम स्कूलींग’प्रमाणे ग्रामीण पोरांनाही मुक्त विद्यालयामुळे शाळेत न जाता शिकण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यांच्या मदतीसाठी संपर्क केंद्र उघडली जाणार असून त्यासाठी शाळांची नोंदणी करण्याचे आदेश विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिवांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
पोरांनो, शाळेत न जाताही घ्या शालेय शिक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 3:55 PM
महाविद्यालयात न जाताही पदव्या मिळविण्याचा मार्ग देशभरातील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठामुळे उपलब्ध आहे. मात्र महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणही शाळेत न जाता पूर्ण करता येणार आहे.
ठळक मुद्देमुक्त विद्यालय मंडळराज्यात अमलबजावणी सुरू अमरावती विभागात होणार ५६ संपर्क केंद्र