यवतमाळ : पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रश्न विचारला आणि मोबाइलमध्ये चित्रिकरण केल्याच्या कारणावरून त्यांना थेट अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांची नावं युवराज दाभाडे आणि प्रशांत राठोड अशी आहेत. या दोघांचा मोबाइल जप्त करुन त्यांना अटक करण्याचा आदेश देणाऱ्या तावडेंनी मंत्री पदाची नैतिकता ठेवून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी केली आहे.
पुढे ते असंही म्हणालेत की, भाजपाचे शासन आणि शिक्षण खाते सातत्याने शैक्षणिक विरोधी धोरण असलेल्या जुलमी शासनाप्रमाणे वागत आहेत. शाळा बंद करण्याचा निर्णय असो की अमरावतीतील विद्यार्थ्यांच्या अटके आदेश देण्याचे प्रकरण असो प्रत्येक निर्णय हा लोकशाहीचा उल्लंघन करणारा आहे. कदाचित भाजपा आणि तावडेंना लोकशाहीवर विश्वास नसावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री या नात्याने तावडेंना प्रश्न विचारला होता. तावडेंना प्रश्नाचे उत्तर द्यायचे नव्हते. म्हणून थेट मोबाइल जप्त करून अटकेचा आदेश देणे म्हणजे जुलमी शासनाचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही, असेही मिर्झा म्हणालेत. या घटनेचा मिर्झा यांनी निषेधही व्यक्त केला आहे.