अभ्यास करण्याचा सल्ला : अकरावी प्रवेश, आरटीई अंमलबजावणीचा आढावायवतमाळ : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी आढावा बैठकीदरम्यान शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. मंत्र्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे न आल्याने या अधिकाऱ्यांना ‘अपडेट’ राहण्याचा आणि अभ्यास करण्याचा सल्ला ना.दर्डा यांनी दिला. ना.राजेंद्र दर्डा शनिवारी यवतमाळच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दर्डा उद्यान येथे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी आणि अकरावी प्रवेशाचा तिढा या प्रमुख मुद्यांवर यावेळी चर्चा झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ८६० विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळाला आहे. यावर्षी दहावीत एकूण ३४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. प्रवेशासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयातूनही प्रक्रिया राबविण्यात आल्याचे यावेळी सांगितले. वाढीव तुकड्यांसंदर्भात शिक्षण संचालकाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेच्या ११, वाणिज्य शाखेच्या चार अशा एकूण १५ तुकड्यांचे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या शिवाय मुख्याध्यापकांना वाढीव तुकड्यासंदर्भातील प्रस्ताव मागितले असल्याचेही प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी वसावे यांनी सांगितले.ना. राजेंद्र दर्डा यांनी आरटीईअंतर्गत जिल्ह्यात २५ टक्के अनुसूचित जाती, जमाती विद्यार्थ्यांना जो सवलतीचा लाभ दिला जातो त्याची नेमकी संख्या किती याची विचारणा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. मंत्र्यांच्या या प्रश्नाने अधिकारी गोंधळले. सर्वांनी एकमेकाकडे पाहिले. कुणीच अपडेट नसल्याने उपस्थितांपैकी कुणालाही उत्तर देता आले नाही. अखेर या अधिकाऱ्यांना अभ्यास करण्याचा सल्ला मंत्र्यांनी दिला. यावेळी शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, उपशिक्षणाधिकारी वसंत इंगोले, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी चव्हाण, रोहणे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
शिक्षणमंत्र्यांपुढे शिक्षणाधिकारी अनुत्तरित
By admin | Published: July 20, 2014 12:10 AM