भारतीय जैन संघटना : जिल्ह्यातून ५० विद्यार्थ्यांची होणार निवडयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटना सरसावली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अशा ५० मुलांची निवड करून त्यांच्या पाचवी ते बारावी पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही संघटना घेणार आहे. त्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात भारतीय जैन संघटनेचे गेल्या दोन दशकांपासून अव्याहत कार्य सुरू आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्या नेतृत्वात पुण्यातील वाघोली येथे सुसज्ज असा शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. खिल्लारीमध्ये भूकंप झाला त्यावेळी तेथील आपद्ग्रस्त कुटुंबातील तब्बल १२०० मुलांची जबाबदारी या संघटनेने घेतली. त्यांना वाघोलीच्या केंद्रात ठेवून त्यांचे सर्व शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मेळघाटातही आदिवासी मुलांना अशाच प्रकारे मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न भारतीय जैन संघटनेतर्फे करण्यात आले.कोणत्या विद्यार्थ्यांची होणार निवड ?भारतीय जैन संघटना पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची या प्रकल्पासाठी निवड करणार आहे. ज्या शेतकरी कुटुंबात २०१४ व २०१५ या वर्षात वडीलाने किंवा आजोबाने आत्महत्या केली आहे, अशा कुटुंबातील मुलांची व मुलींची निवड केली जाणार आहे. वाघोली, पुणे येथे शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पा सोबतच भारतीय जैन संघटनेचे सर्व सोयीयुक्त वसतिगृह आहे. तेथे या मुलांच्या राहण्याची-जेवणाची, शैक्षणिक साहित्य, कपड्यांची, आरोग्याची तसेच मुलांचा सर्वंकक्ष विकास व्हावा, यासाठी सर्व व्यवस्था असतील. तर शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात अत्यंत आल्हाददायक वातावरणात त्यांचे शिक्षण पूर्ण केले जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प
By admin | Published: December 31, 2015 2:41 AM