यवतमाळ : निम्न पैनगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यास सिंचन क्षमतेत तीन पट वाढ होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याचे राष्ट्रीयकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथील विश्रामगृहावर गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी वैयक्तित सिंचन सुविधा उभारणीला वेग दिला जात आहे. यासाठीच सर्व नद्या, नाले यांचा सर्वे यंत्रणेकडून करण्यात आला आहे. खनिज विकास निधीतून काम करण्यासाठी तसा आराखडा मुख्यमंत्र्यांनी मागितला आहे. बहुतांश भाग सिंचनाखाली आणण्यासाठी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे, याकरिता केंद्रात पाठपुरावा सुरू असल्याचेही हंसराज अहीर यांनी सांगितले. जिल्ह्यात मागेल त्या शेतकऱ्याला वीज जोडणी देण्यात येणार आहे. आज जिल्ह्याची मागणी पूर्ण करेल इतकी वीज घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही. आयव्हीआरसीएल या कंपनीने काम न केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. यासाठी नवीन ठेकेदारांना काम दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. निम्न पैनगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यास सिंचन क्षमतेत तीन पट वाढ होणार आहे. याशिवाय प्रत्येक धरणाच्या कालव्यांचे बांधकाम करण्यावर भर देणार असल्याचहीे सांगितले. यवतमाळ मुकुटबन येथे पूर्णा एक्सप्रेसला थांबा दिला जाणार आहे. वणी, मुकुटबन, बोरी या मार्गाच्या निर्मितीसाठी ४५ कोटींचे बजेट प्रस्तावित केले आहे. यवतमाळात टेक्सटाईल्स झोन निर्माण करण्यासाठी मुंबईतील नऊ गिरण्या स्थलांतरित केल्या जात आहे. यातील बहुतांश गिरण्या यवतमाळ कशा येतील यासाठी प्रयत्न सुरू आहे. सिंचनासाठी ग्राम आणि कृषी सिंचन योजना केंद्र शासनाने कार्यान्वित केली आहे. त्या दृष्टीकोणातून काम सुरू झाल्याचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)
निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या राष्ट्रीयकरणाचा प्रयत्न
By admin | Published: March 06, 2015 2:09 AM