लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एखाद्या महिलेच्या पोटातून अनावश्यक मांसाचा गोळा बाहेर काढण्याच्या अनेक शस्त्रक्रिया होतात. मात्र यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विश्वास बसणार नाही एवढ्या वजनाचा गोळा महिलेच्या गर्भाशयातून काढण्यात आला. तब्बल आठ किलो वजनाचा मांसाचा गोळा तयार झाल्याने ही महिला असह्य वेदनेने तडफडत होती. या दुखण्यातून तिची डॉक्टरांनी सुखरूप सुटका केली.संगीता पांडुरंग डोंगरे (४०) रा.कोसरी ता.मारेगाव या महिलेला पोटात असह्य दुखणे होते. ती १४ डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली. मागील सात महिन्यांपासून तिला पोटदुखीचा त्रास होत होता. स्त्रीरोग तज्ज्ञांनी तिच्या गर्भाशयाची व पोटाची चाचणी केली. सिटी स्कॅनच्या अहवालामध्ये महिलेच्या पोटात मोठा गोळा असल्याचे आढळून आले. हा गोळा ओटीपोटापासून थेट बरगड्यांपर्यंत वाढला असल्याचे निदान झाले. इतक्या मोठ्या वजनाचा व आकाराचा गोळा पहिल्यांदाच महिलेच्या पोटात असल्याचे आढळून आले. ही बाब आव्हानात्मक वाटल्याने या महिलेला सेवाग्राम येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर महिलेच्या जीवाला धोका असल्याचे कारण सांगून शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. ती महिला परत मेडिकलमध्ये आली.यवतमाळ मेडिकलमध्ये शल्य चिकित्सा शास्त्र विभागात तिने तपासणी केली. तिला २० डिसेंबर रोजी विविध तपासण्या करून शस्त्रक्रियेसाठी आॅपरेशन थिएटरमध्ये घेण्यात आले. दुप्पट आकारमानाचा गोळा असल्याने अनेक धोके संभावत होते. शस्त्रक्रिया विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय पोटे व त्यांच्या टीममधील डॉ. विजय कनाके, डॉ. मनिष प्रजापती, डॉ. भूषण ठाकरे, डॉ. सुमेश डोईफोडे, डॉ. शरद जाधव, डॉ. मृणाल काकडे, डॉ. नागेश उंदरे, डॉ. सांकेत मुंधडा, डॉ. प्रतीक्षा जोशी, डॉ. नागेश अमानकर यांनी शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला. इतक्या मोठ्या प्रमाणात पोटात गोळा असल्याने शस्त्रक्रियेसाठी अॅनेस्थिशिया देण्याचे आव्हान होते. विभाग प्रमुख डॉ. दामोधर पटवर्धन यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कौशल्यपूर्णरित्या त्या महिलेला अॅनेस्थिशिया देण्याचे काम केले. यात त्यांना डॉ. रोशन शेंडे, डॉ. भूषण अंबारे, डॉ. विनय धकाते, डॉ. शीतल मानकर, डॉ. अजिंक्य वानोरे यांनी सहकार्य केले. तब्बल दीड तास परिश्रम करून ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. आता तीन दिवसात या महिलेच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा आहे. सात महिन्यांपासून असह्य वेदनेने तडफणाऱ्या महिलेला खऱ्या अर्थाने जीवनदान मिळाले. तिने येथील डॉक्टरांचे लाख-लाख धन्यवाद मानले. या शस्त्रक्रियेसाठी परिचारिका मीनाक्षी डाखोले, रंजनी बोमले, वंदना जमनारे, स्नेहा झाडे, छाया मोरे, स्वाती रोडे, वॉर्डबॉय पुरुषोत्तम देवतळे यांनी मदत केली. शस्त्रक्रियेनंतरही या महिलेची विशेष काळजीपूर्वक सुश्रृषा केली जात आहे. यामुळेच तिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याचे दिसते. या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार व शल्यचिकित्सा शास्त्र (सर्जरी) विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश जतकर यांनी सर्वांचेच कौतुक केले.
गर्भाशयातून काढला आठ किलो मांसाचा गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 5:00 AM
मागील सात महिन्यांपासून तिला पोटदुखीचा त्रास होत होता. स्त्रीरोग तज्ज्ञांनी तिच्या गर्भाशयाची व पोटाची चाचणी केली. सिटी स्कॅनच्या अहवालामध्ये महिलेच्या पोटात मोठा गोळा असल्याचे आढळून आले. हा गोळा ओटीपोटापासून थेट बरगड्यांपर्यंत वाढला असल्याचे निदान झाले. इतक्या मोठ्या वजनाचा व आकाराचा गोळा पहिल्यांदाच महिलेच्या पोटात असल्याचे आढळून आले. ही बाब आव्हानात्मक वाटल्याने या महिलेला सेवाग्राम येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर महिलेच्या जीवाला धोका असल्याचे कारण सांगून शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. ती महिला परत मेडिकलमध्ये आली.
ठळक मुद्दे‘मेडिकल’मध्ये शस्त्रक्रिया : असह्य वेदनेतून महिलेची केली सुखरूप सुटका, तीन तास चालली शस्त्रक्रिया