फलकबाजीतून उमेदवारीचे संकेत : राजकीय पक्षांकडून चाचपणी, इच्छुकांची मोर्चेबांधणीसुरेंद्र राऊत यवतमाळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नाही. केवळ प्रभाग रचनेचे प्रारुप आणि आरक्षणाचे प्रारुप जाहीर झाले. या आधारावरच प्रत्यक्ष रणधुमाळीला इच्छुकांनी सुरुवात केली आहे. यवतमाळसह अनेक प्रमुख नगरपरिषदांमध्ये फलकबाजीला जोर चढला असून कार्यप्रसंगातही या इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते. जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यवतमाळ, पुसद, दिग्रस, उमरखेड, वणी या पाच नगरपरिषदा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महत्वाच्या मानल्या जातात. यातही वणी आणि यवतमाळ येथे पक्षीय राजकारणाला कोणतेच स्थान नाही. यवतमाळात भाजपाची सत्ता राष्ट्रवादीच्या कुबडीने आहे. मात्र भाजपा नगरसेवकांमध्येच मोठे गट पडले, विरोधी बाकावरच्या काँग्रेसमध्येही जाहीर गटबाजी आहे. अशीच स्थिती वणी नगरपरिषदेत आहे. संख्याबळ सर्वाधिक असूनही येथे मनसेला सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामुळे या दोनही शहरात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुठल्या राजकीय घडामोडी होतात, यावर सर्वांचेच लक्ष आहे. आर्णी, घाटंजी, दारव्हा येथे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. या ठिकाणी तुलनेने फार मोठे राजकीय स्थित्यंत पाच वर्षात घडले नाही. मात्र या निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र उतरण्याच्या मानसिकतेत असल्याने येथेही चुरस राहणार आहे. आतापर्यंत यवतमाळातील सत्ता केंद्र हे प्रभाग क्र. ५ मध्येच राहिले आहे. या प्रभागातून बाळासाहेब चौधरी यांनी दीर्घकाळ नगराध्यक्षपद भूषविले. त्यानंतर योगेश गढिया यांनी अडीच वर्ष आणि आता सुभाष राय नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे शहराच्या राजकारणात सत्ता केंद्र असलेल्या या प्रभागातून नगराध्यक्षपद दुसरीकडे हलविण्यासाठी मोर्चेबांधणी होत आहे. आता नगराध्यक्ष थेट जनतेतून असल्याने अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले नसले तरी इच्छुकांच्या हालचाली मात्र तीव्र झाल्या आहेत. ग्रामीण भागातील इच्छुकांकडूनसुद्धा आपआपला बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. सध्या तरी सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढण्याची भाषा करीत आहे. घडामोडीत युती-आघाडी होणार काय हेही महत्वाचे ठरणार आहे. नवीन प्रभाग रचनेत द्विसदस्य पद्धती आहे. ‘फ्लेक्स’मधून प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्नयवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात आठ मोठ्या ग्रामपंचायती समाविष्ठ झाल्या. जिल्हा मुख्यालयाची ही नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहे. तर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होण्याअगोदरच अनेकांनी फलकबाजीच्या माध्यमातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. विविध औचित्य साधून भलेमोठे फ्लेक्स लावून जनमाणसात आपली प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. यवतमाळ शहरात ग्रामपंचायती आल्याने प्रभाग रचनेत बऱ्याचअंशी फेरबदल झाले आहे.
आठ नगरपरिषदांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी
By admin | Published: July 26, 2016 12:03 AM