अविनाश साबापुरे
यवतमाळ : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत देशभरातील शिक्षण क्षेत्राची त्रेधा उडविली. यातच तब्बल ७.९ टक्के मुलींनी दहावीनंतर शाळा सोडली, तर दोन टक्के मुलींनी आठवीनंतर शिक्षण सोडल्याची गंभीर आकडेवारी पुढे आली आहे. प्रथम फाउंडेशनने बुधवारी जाहीर केलेल्या ‘असर’ अहवालातून ही आकडेवारी पुढे आली आहे.
प्रथम संस्थेने २०२२ या वर्षभरातील देशातील शैक्षणिक परिस्थितीचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सर्वे केला. त्यासाठी देशभरातील ६१६ जिल्ह्यांतील १९ हजार ६० खेड्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या गेल्या. २७ हजार ५३६ स्वयंसेवकांनी देशातील सहा लाख ९९ हजार ५९७ विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन हे सर्वेक्षण केले. त्यातून शालेय शिक्षणाची कोविडनंतरची परिस्थिती पुढे आणणारा असर (ॲन्यूअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट) अहवाल शासनाला बुधवारी सादर करण्यात आला.
या अहवालानुसार २०१६ मध्ये १६.१ आणि २०१८ मध्ये १३.५ टक्के १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनी शाळाबाह्य होत्या. मधली दोन वर्षे कोरोनामुळे शाळाच बंद होत्या. तर २०२२ मध्ये मात्र १६ वर्षे वयोगटातील ७.९ टक्के विद्यार्थिनी शाळाबाह्य असल्याचे पुढे आले आहे. याच वयोगटातील सात टक्के मुलेही दहावीनंतर शाळेतच गेलेले नाहीत. मागील दोन सर्वेक्षणाच्या तुलनेत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण २०२२ मध्ये घटल्याचे दिसत असले तरी २०१८ या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत २०२२ मधील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनानंतर परत शाळेत जाण्यापेक्षा अनेक मुलींचे लग्न आटोपल्याची शक्यता या अहवालातून पुढे आली आहे. दहा राज्यात शाळा सोडणाऱ्या मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
कोणत्या राज्यात किती मुली शाळाबाह्य
*राज्य - सरासरी*
- राजस्थान - ९.४ टक्के
- छत्तीसगड - ११.१ टक्के
- ओडिशा - ७.३ टक्के
- झारखंड - ५.२ टक्के
- बिहार - ६.७ टक्के
- गुजरात - ८.० टक्के
- उत्तरप्रदेश - १५.० टक्के
- पश्चिम बंगाल - २.६ टक्के
- मध्यप्रदेश - १७.० टक्के
- आंध्रप्रदेश - २.० टक्के
गुरुजींची हजेरी मात्र वाढली
कोरोनाकाळानंतर शाळेतील शिक्षकांच्या हजेरीत मात्र वाढ झाली आहे. असर अहवालानुसार २०१० मध्ये प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या वर्षभरातील उपस्थितीचे प्रमाण ८६.४ टक्के होते. २०१४ आणि २०१८ मध्येही हे प्रमाण ८५.८ टक्के होते. परंतु २०२२ च्या ताज्या अहवालानुसार शिक्षकांच्या उपस्थितीचे प्रमाण ८७.५ टक्के नोंदविले गेले. विशेष म्हणजे, याच कालावधीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाणही वाढले आहे.