मारेगाव : कोरोनच्या दुसऱ्या लाटेने येथील नगरपंचायतीची निवडणूक लांबली. त्यामुळे राजकीय इच्छुकांचा हिरमोड झाला होता. परंतु आता कोरोनाचा असर कमी होताच पुन्हा शहरातील इच्छुक निवडणुकीच्या कामाला लागले असून भेटीगाठीचे सत्र सुरू झाले आहे.
मागील निवडणुकीत शहरात नगरपंचायत स्थापन झाली, तेव्हा मतदार आणि उमेदवार दोघांनाही या निवडणुकीचे फारसे महत्त्व कळलेले नव्हते. त्यामुळे पहिल्या निवडणुकीत फारशी रणधुमाळी दिसून आली नाही. उमेदवारांना ही निवडणूक सोपी गेली. परंतु गेल्या पाच वर्षात नगरपंचायत सदस्यांचे काय महत्त्व आहे, याचा अनुभव उमेदवारांसोबतच मतदारांनाही आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२० मध्ये नगरपंचायतीची पहिली टर्म संपताच, या निवडणुकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. वाॅर्डनिहाय आरक्षण, मतदार याद्या तयार झाल्यावर कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने ऐन वेळेवर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. १७ नगरसेवकांसाठी होऊ घातलेल्या या निवडणुका पुढील महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी पुन्हा इच्छुक उमेदवार व मतदार सरसावल्याचे चित्र शहरात दिसत आहे. यावेळच्या निवडणुका कसदार होणार असून मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी होणार आहे. त्यामुळे इच्छुकांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.