ढाणकी : कृषी पंपाच्या कनेक्शनसाठी ११ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यास अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले. अल्केश अग्रवाल असे या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. गांजेगाव येथील गणपत कौटकर हे कृषी पंपाच्या कनेक्शनसाठी ढाणकी येथील वीज वितरणच्या कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून येरझरा मारत होते. तेथील कनिष्ठ अभियंता अल्केश अग्रवाल याने त्यांच्याकडे ११ हजार रुपयांची मागणी केली. याबाबतची तक्रार कौटकर यांनी लाचलुचपत विभागाकडे केली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ६ वाजता सापळा रचण्यात आला. अग्रवाल याच्या सांगण्यानुसार ११ हजार रुपये विद्युत सहायक रवी सानप याला द्यायचे होते. त्यानुसार सानप स्वत: शेतकरी गणपत कौटकर यांच्याकडे गेला. परंतु कौटकर यांनी मी पैसे अग्रवाल साहेबांनाच देतो, असे सांगितले. त्यामुळे सानप गणपत कौटकर यांना घेऊन अल्केश अग्रवाल याच्याकडे आला. यावेळी अग्रवाल हा वैभव कोठारी याच्या नवकार कलेक्शन या कपड्याच्या दुकानात बसला होता. कौटकर यांनी अग्रवालने मागितलेली लाचेची ११ हजार रुपयांची रक्कम त्यांना देऊ केली असता अग्रवालने ही रक्कम कोठारी याला घेण्यास सांगितली. त्यानुसार वैभव कोठारी याने ती रक्कम घेतली व मोजून अग्रवाल याच्या स्वाधीन केली. याचवेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अल्केश अग्रवाल, रवी सानप व वैभव कोठारी या तिघांनाही पकडले. पुढील कारवाईसाठी बिटरगाव पोलीस ठाण्यात घेऊन गेले. (वार्ताहर)
वीज अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडले
By admin | Published: November 19, 2015 3:03 AM